
बजाज अलियांझ, पुणे हाफ मॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस् इन्स्टिटय़ूटने पुरुष विभागात वर्चस्व राखले. सहकाऱयांवर एकतर्फी वर्चस्व राखताना गुरखा रेजिमेंट आणि मूळ नेपाळच्या असणाऱया तीर्थ पुन याने अगदी आरामात या शर्यतीत विजेतेपद मिळविले. त्याने 1 तास 5 मिनिटे 5 सेकंद अशी सरस वेळ दिली. महिला गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले. क्रीडा क्षेत्रातील खरी गुणवत्ता ही शहरात नाही, तर ग्रामीण भागात दडली असल्याचे स्वाती गाढवे आणि ज्योती गवाते यांनी बजाज अलियांझ, पुणे मॅरेथॉन शर्यतीत दाखवून दिले. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा दांडगा अनुभव असलेल्या या दोघींनी अनुक्रमे पहिला, दुसरा क्रमांक मिळविला. नयन किरदत तिसरी आली. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातून पहाटे 5.15 वाजता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत शर्यतीला सुरुवात झाली. त्यानंतर संकुलातून बाहेर पडून 21 कि.मी. अंतराच्या पूर्ण मार्गापासून ते अंतिम रेषेपर्यंत फक्त आणि फक्त तीर्थचेच वर्चस्व होते. त्याने अगदी सहजपणे शर्यत जिंकताना मानसिंग आणि विक्रम सिंग या सहकाऱयांना मोठय़ा फरकाने मागे टाकले.




























































