पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे पडल्यानं वाहतूक मंदावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरात ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. रस्त्यावर झाडे तसेच फांद्या पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली. मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दुपारी कर्वेनगर भागातील नवसह्याद्री परिसर, विठ्ठल मंदिर तसेच एरंडवणे भागातील पटवर्धन बाग भागात झाडे कोसळली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली. शहरात दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. पावसामुळे वस्ती भागात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या नाहीत. मात्र, खडकवासला धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून नदीपात्र परिसरात अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

वाहतूकीसाठी भिडे पूल बंद

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने मुळा-मुठा डेक्कन जिमखाना परिसरातील नदीपात्रात असलेला भिडे पूल वाहतुकीस बंद करण्यात आला. सुरक्षेचा उपाय म्हणून भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असल्याचे डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले. डेक्कन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि वाहतूक शाखेतील कर्मचाNयांकडून भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.