मटण खाल्ल्यानंतर बिल मागताच वेटरचे केले अपहरण, पाच जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉटेलमध्ये मटण खाल्ल्यानंतर बिल मागितल्याच्या रागातून टोळक्यान वेटरला मारहाण करीत त्याचे मोटारीतून अपहरण केल्याची धक्कादायक घटना 11 ते 12 जुलैला आंबेडकर चौक ते कोंढवा खुर्द परिसरात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक करून वेटरची सुटका केली आहे.

योगेश सर्जेराव पारधे (वय 28, रा. नगर), रविंद्र सखाहरी कानडे (41), रुपेश अशोक वाडेकर (38), ओंकार जालिंदर बेंद्रे (38) आणि नितीन अशोक वाडेकर (32) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. किशोर कोईराला असे सुटका केलेल्या वेटरचे नाव आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

नवीन कात्रज बोगद्याजवळ रानवारा हॉटेल असून 11 जुलैला आरोपी त्याठिकाणी जेवण करण्यासाठी गेले होते. त्यांनी मटणावर ताव मारल्यानंतर वेटर किशोरने आरोपींकडे बिलाची मागणी केली त्याचा राग आल्यामुळे पाचजणांनी किशोरला मारहाण करीत जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण मोटारीत बसविले. त्याला घेउन जाताना आरोपींनी तुम्हाला याच्या मरणाची खबर येईल अशी धमकी दिली. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्काळ शोध मोहिम राबविली. मात्र, काही अंतरावर आरोपींनी किशोरला सोडून दिले.

पसार अपहरणकर्ते आरोपी जेजुरी परिसरात असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विक्रम सावंत आणि नीलेश खैरमोडे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे आणि उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक जन्ननाथ कळकसर, रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, मंगेश बोराडे, नरेंद्र महांगरे, अवधूत जमदाडे, आशिष गायकवाड, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, विक्रम सावंत, नीलेश खैरमोडे यांनी केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे करीत आहेत.