
कात्रज बाह्यवळणाहून नवले ब्रिजकडे जात असताना भरधाव मालवाहू ट्रकचा पुढचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर 7 जण जखमी झाले असून त्यापैकी चौघांनी प्रकृती गंभीर आहे. ट्रकने दिलेल्या धडकेत 4 मोटारी एक टेम्पो, 8 दुचाकींसह 13 वाहनांचा चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. हा अपघात सकाळी पावणेअकराच्या सुमारास पोतदार इंटरनॅशनल स्कूलच्या समोर घडला.
शुभम प्रकाश सुपेकर (वय 24, रा. आंबेगाव) असे ठार झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. प्रकाश अशोक आरख (वय 33, रा. उत्तमनगर), राहणे रवींद्र स्वामीलाल (वय 55, रा. कोंढवे धावडे), इतनेव नागनाथ भारत (वय 31, रा. कोंढवा), विलास सदाशिव जगताप अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर विठ्ठल तुकाराम झेंडे (वय 50) इंद्रभान हिराजी शिंदे (वय 70, सिंहगड), ऋतूराज इंद्रभान शिंदे (वय 39, अशी किरकोळ जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास मालवाहू ट्रक (एमएच 12 एचसी 7299) कोळसा घेऊन नवले ब्रीजच्या दिशेने जात होता. पोतदार स्कूलसमोरील बाबाजी पेट्रोल पंपासमोर वेगातील ट्रकच्या पुढच्या बाजूचा डावा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने रस्त्यावरील वाहनचालकांना चिरडले. त्यामध्ये ट्रकखाली सापडल्यामुळे दुचाकीस्वार शुभम जागीच ठार झाला. तर सातजण जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे एकच खळबळ होती. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, पोलीस निरीक्षक वसंत कुंवर, पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी धाव घेतली.
असा झाला अपघात
कात्रज बाह्यवळण रस्त्यावर वाहतूक सुरू असताना अचानक पाठीमागून आलेल्या ट्रकचा टायर फुटला. त्यामुळे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकचालकाने आसपासच्या वाहनांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार ट्रकखाली आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ वाहतूक पोलिस तत्काळ दाखल झाले. त्यानंतर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रेनद्वारे अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर सुमारे सव्वा तासाने वाहतूक सुरळित करण्यात आली.
तर अपघात झाला नसता
मालवाहू ट्रकची पुढील दोन्ही चाके अतिशय कमकुवत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ट्रक उतारावर असताना मालाचा बोजा मोठ्या प्रमाणात आल्याने टायर फुटून अपघात घडला. अपघातग्रस्त मालवाहू ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल होता की नाही, याबद्दल माहिती घेउन कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मालवाहू ट्रकने पहिल्यांदा दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर चालकाने ट्रक वळविल्याने धडक बसून पीकअप टेम्पो पूलावरुन खाली पडला. ट्रकचालकाने एकापाठोपाठ दुचाकीस्वारांना धडक दिल्यामुळे अनेकांना दुखापत झाली होती. अपघातात जखमी झालेल्यांना रिक्षाचालक मित्रांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले – कुणाल कोथंबिरे, प्रत्यक्षदर्शी, (रा. मांगडेवाडी, पुणे )
ट्रकचा टायर फुटल्याने अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे चालकाने दिलेल्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार झाल असून पाच जण जखमी झाले आहे. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला आहे. याप्रकरणी भारतीय दंड कायदा 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. – वसंत कुंवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ
पाहा व्हिडीओ-




























































