
शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करणारे अॅड. उमेश मोरे मागील आठ दिवसांपासून बेपत्ता आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. एका लाच प्रकरणात ते फिर्यादी होते. त्यामुळे या अपहरणाचा पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी प्रशांत मोरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उमेश मोरे हे धनकवडी भागात राहत असून शिवाजीनगर न्यायालयात नामांकित वकिलांकडे प्रॅक्टिस करतात. 2018 मधील एका मोठ्या लाच प्रकरणातील ते फिर्यादी आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार भूमी अभिलेख अभियंता बाळासाहेब वानखेडे यांच्यावर एसीबीने कारवाई केली होती. 1 ऑक्टोबरला सकाळी उमेश हे न्यायालयात त्यांच्या काही मित्रांशी भेटले दुपारी त्यांचे फोनवर पत्नीशी बोलणे झाले. मात्र रात्री नऊ पर्यंत ते घरी आले नाही. त्यानंतर प्रशांत यांनी 2 ऑक्टोबरला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. पण तीन दिवसात त्यांचा संपर्क न झाल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. शिवाजीनगर पोलीस गेल्या काही दिवसांपासून त्यांचा शोध घेत आहे. त्यांची दुचाकी शिवाजीनगर परिसरात सापडली आहे. त्यांचे मित्र, कुटुंबीय नातेवाईक अश्या जवळपास 50 ते 55 व्यक्तींकडे पोलिसांनी विचारपूस केली आहे. त्यांच्या तपासासाठी वेगवेगळ्या तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.





























































