कवठे येमाईत बिबट्याचा थरार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई – शिक्रापुर रस्त्यालगत असलेल्या ढाकी वस्तीवर गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची मोठीच दहशत पसरली होती. सोमवारी रात्री 9 च्या सुमारास घराजवळ बांधलेल्या एका घोडीवर बिबट्याने हल्ला करीत तिला ठार केले. परिसरातील नागरिकांनी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच त्या ठिकाणी पिंजरा लावल्याने भुकेलेला हा बिबट्या रात्री 1 च्या सुमारास पिंजऱ्यात जेरबंद झाला.

कवठे येमाईच्या ढाकी वस्तीवरील बहुतांश शेतकरी शेतातच घर बांधुन वास्तव्यास आहेत.सोमवार सोवमारी सायंकाळी 9 च्या दरम्यान दगडू वामन सांडभोर यांच्या घराजवळ शेतात बांधलेल्या घोडीवर हल्ला चढवत बिबटयाने घोडी ठार केली. घोडीच्या नरडीचे रक्त प्राशन करुन बिबट्या पसार झाला. तर लगेचच घडलेला हा सर्व प्रकार परिसरातील तरुणांच्या लक्षात आल्यानंतर वस्तीवरील तरुणांनी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय सांडभोर यांचेशी संपर्क साधला त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क केला. यानंतर बिबटयाला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. भक्ष म्हणून पिंजऱ्यात मृत घोडी ठेवण्यात आली. थोडया वेळातच पिजऱ्याचा दरवाजा लागल्याचा आवाज आल्याने दत्तात्रय सांडभोर यांचे घराजवळ थांबलेल्या तरुणांनी बिबट्या पिंजऱ्यामधे जेरबंद झालेची खात्री केली.