
शहरातील मार्केटयार्ड परिसरात एका रद्दीच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पेपर रद्दी जळून खाक झाली आहे. गोदमाशेजारी उभ्या केलेल्या ट्रकमध्येही रद्दीला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सुमारे सहा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड परिसरात कृषी पणन महामंडळ कार्यालयाच्या मागील बाजूला समीर दत्तात्रय निकम यांचे पेपर रद्दीचे गोदाम होते. त्याठिकाणी रद्दीची मोठया प्रमाणात साठवून करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे रद्दी कोणत्याही ठिकाणी पाठविण्यात आली नव्हती. त्यामुळे गोदामात रद्दी साठवून ठेवली होती. बुधवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी गोदामालाआग लागल्याची वर्दी अग्निशामक दलाला मिळाली. त्यानुसार फायर अधिकारी प्रमोद सोनवणे आणि त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळेस गोदामामध्ये एक टेम्पो उभा होता. त्यामध्ये असलेल्या पेपरला मोठी आग लागली होती. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल सहा तासांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. गोदामात पेपर असल्यामुळे आगीने रुद्र रूप धारण केले होते. आगीमध्ये गोदामामधील सर्व पेपर, टेम्पो आणि वस्तू जाळून खाक झाले असल्याची माहिती अग्निशामक विभागाकडून देण्यात आली.



























































