पूरग्रस्त परिवारसाठी मर्चंट चेंबर्सचा मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंच्या 1 हजार किट रवाना

मराठवाड्यातील अचानक आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. घरे कोसळली, शेतीचे स्वप्न वाहून गेले आणि असंख्य कुटुंबे अडचणीत सापडली. अशा कठीण प्रसंगात दि पूना मर्चंट्स चेंबरने मदतीचा हात पुढे करत १ हजार जीवनावश्यक वस्तूंच्या किट पाठवले आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पुरग्रस्त गावांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किटची व्यवस्था केली आहे. रविवारी पुण्यातील चेंबरच्या कार्यालयातून ही मदत घेऊन जाणारी गाडी निघाली असून, सोमवारी सकाळी या किटचे वाटप केले जाणार आहे. चेंबरच्या टीमने स्वतः सर्वेक्षण करून गरजू कुटुंबांची यादी तयार केली आहे. भूम तालुक्यातील उडुप, तांबेवाडी, चिंचोली, ब्रह्माणपूर आणि सूकटा या गावांतील पूरग्रस्तांसाठी ही मदत दिली जाणार आहे. या कार्यात स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, शासकीय कर्मचारी, पोलीस अधिकारी, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि तहसीलदार यांनी सहकार्य केले आहे. चेंबरचे पदाधिकारी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून मदत पोहोचवणार आहेत.

आपत्तीच्या काळात मदत करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. चेंबरने नेहमीच मदतीची परंपरा जपली आहे. आताही मराठवाड्यातील गरजू बांधवांना सन्मानाने सहाय्य मिळावे या भावनेतून मदत केली जात आहे. प्राथमिक टप्प्यात १ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले जाणार आहे. या उपक्रमासाठी चेंबरचे सभासद आणि देणगीदार यांनी उत्स्फूर्तपणे योगदान दिले.

– राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर,पुणे.