
धाराशिवमधून पुण्यात पत्नीला भेटायला सराईत दुचाकीचोर आला असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या युनीट पाचने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल साडेसात लाख रूपयांच्या 18 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शंकर भरत देवकुळे (वय – 28, रा. खामसवाडी, खेसेगांव, ता. तुळजापुर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
शहरातील वाहनचोरी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हे शाखेला सूचित केले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरट्यांची कुंडली तपासण्यात येत होती. गुन्हे शाखा युनीट पाचचे पथक 1 सप्टेंबरला हडपसर आणि मुंढवा परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी घोरपडी परिसरात एक सराईत वाहनचोर पत्नीला भेटण्यासाठी आल्याची माहिती पोलीस हवालदार विशाल भिलारे आणि प्रमोद टिळेकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून शंकर देवकुळे याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने पुणे शहरातील विविध भागातून 18 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पथकाने पुणे शहर-11, पिंपरी चिंचवड आयुक्तालय -3, नगर आणि पुणे ग्रामीण 1 असे मिळून 16 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ही कामगिरी उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उप निरीक्षक सोमनाथ शेंडगे, रमेश साबळे, प्रमोद टिळेकर, दया शेगर, विशाल भिलारे, विलास खंदारे, महेश वाघमारे, प्रविण काळभोर, विनोद शिवले, अकबर शेख, पृथ्वीराज पांडोळे, दाऊद सय्यद, अजय गायकवाड, चेतन चव्हाण, अश्रृबा मोराळे, संजयकुमार दळवी, स्नेहल जाधव, स्वाती गावडे यांनी केली.
”पथकाकडून हद्दीत पेट्रोलिंग करण्यात येत होते. त्यावेळी सराईत दुचाकीस्वाराची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 18 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून आणखी तपास सुरू आहे.”
– हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक, युनीट पाच


























































