
पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोटमध्ये गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या पावसामुळे बहुतांशी धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱया वरसगाव धरणातून आज सकाळी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर खडकवासला धरणातून सायंकाळी 18 हजार 483 क्युसेक पाणी मुठा नदीमध्ये सोडण्यात आल्याने नदीला पूर आला असून भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. चासकमान धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. नीरा देवघर, भाटघर, पवना, आंद्रा, मुळशी, वीर या धरणांतूनही पाणी सोडण्यात आले.
उजनीचे 16 दरवाजे उघडले
भीमा खोऱयातील 10 धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. दौंड येथून सायंकाळी 26 हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत असल्याने उजनी धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आली आहेत. आंद्रा, कळमोडी, विसापूर ही तीन धरणे 100 टक्के भरली आहेत. तर, कासारसाई, चासकमान, घोड धरणे 91 टक्के भरली आहेत.