Video – पुण्यात नवले ब्रिजजवळ भीषण अपघात; मालवाहू ट्रक चालकाने 8 वाहनांना उडविले, 2 ठार , 7 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगलोरहून मुंबईच्या दिशेने चाललेल्या अवजड मालवाहतूक ट्रक चालकाने नवले ब्रिजजवळील गावगाडा हॉटेलसमोर एकापाठोपाठ 8 वाहनांना धडक दिली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकासह दोघांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

राजेंद्र मुरलीधर गाढवे ( वय 65, रा. आंबेगाव पठार) आणि प्रशांत मधुकर गोरे ( वय 32, रा. नवीन पनवेल, रायगड) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मालवाहू ट्रकचालक प्रेमाराम राणाराम बिष्णोई (रा. जोधपूर, राजस्थान) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. हा अपघात आज संध्याकाळी सहा वाजता घडला आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे, वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके, पोलीस उपनिरीक्षक दीपक खेडकर, पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव अपघाताठिकाणी धाव घेऊन जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.

कात्रज देहूरोड बाह्यवळण नवले ब्रिजजवळ स्टीलने भरलेला ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याने भरधाव वेगात रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहनांना धडक देऊन पुढे गेला. ट्रकचा पुढचा टायर फूटल्याने 500 मीटर अंतरावर थांबला. त्यानंतर ट्रकच्या केबिनखाली आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. नवीन कात्रज बोगद्याकडुन सिंहगड रोडकडे जाताना तीव्र उतार असल्यामुळे जड वाहनाना ब्रेक लवकर लागत नाही. त्यामुळे या परिसरात वारंवार अपघात घडत आहेत. मागील एका महिन्यात परिसरात चार अपघात घडले आहेत.

असा घडला अपघात

आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मालवाहू एक ट्रकचालक मुंबईच्या दिशेने चालला होता. नवले पुलाजवळ आल्यानंतर त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याने समोरील 8 गाड्यांना धडक दिली. त्यामध्ये 4 मोटार, 2 दुचाकी, 1 टेम्पो, 1 रिक्षाला धडक दिली. अपघातामध्ये रिक्षा चालकासह दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाला. अपघातानंतर सिंहगड पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सिंहगड वाहतूक विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी होऊन मदतकार्य केले . अपघातामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.

”साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रक चालकाने 8 वाहनांना धडक दिली. त्यामुळे 2 जणांचा मृत्यु झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताग्रस्त ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.” – नंदकिशोर शेळके, वाहतूक पोलीस निरीक्षक, सिंहगड वाहतूक विभाग