
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया कंपनीच्या मुंढवा येथील जमीन घोटाळा प्रकरणात बावधन पोलीसांनी पार्थ पवार, अजित पवार यांचे दोन स्वीय सहायक, ओएसडी आणि सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करावा, अन्यथा न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला. त्यानंतर त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याप्रकरणातील काही पुरावे दिले. याप्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली.
अंजली दमानिया आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दुपारी बावधन पोलीस ठाण्यात येऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांची भेट घेतली. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील सर्व कागदपत्रे पोलीसांपुढे सादर करत सबंधितांवर त्वरीत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. त्यानंतर पत्रकारांशीही त्यांनी संवाद साधला. या गुन्ह्याचा पोलिस गांभीर्याने तपास करत नाहीत. अतिशय धीम्या गतीने तपास सुरू आहे. पोलीस एखाद्या सामान्य व्यक्तीला तीन-तीन वेळा समन्स पाठवून हजर होण्याची मुभा देतील का, पण दिग्विजय पाटील यांना ती दिली जाते कारण ते पार्थ पवार यांचे मामेभाऊ आहेत. असे दमानीया म्हणाल्या.
सार्कजनिक जीवनात वाकरणाऱया व्यक्तींनी कायद्याचे पालन करणे अपेक्षित आहे. सामान्य नागरिकांवर ज्या नियमांची अंमलबजावणी होते, तेच नियम प्रभाकशाली लोकांनाही लागू झाले पाहिजेत. प्रकरण दडपण्याचा किंवा दुर्लक्ष करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. पोलीस प्रशासनाने दबावाला बळी न पडता कायद्यानुसार कारवाई करावी, असेही त्यांनी बजावले.
न्यायालयात धाव घेणार
हे घोटाळा प्रकरण समोर येऊन पावणेदोन महिने झाले आहेत. परंतु, अद्यापही पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही कारण ते उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत, म्हणून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित प्रकरणात गंभीर स्वरूपाचे आरोप असून, कायद्यापुढे कोणीही मोठा नसतो. या गुह्यातील सर्व दोषींवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही कायद्याच्या सर्व बाबी पाहणार आहोत. त्यानंतरही गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.


























































