Pune news – प्रेम झाले, लग्न केले; पण नांदवेना, पीएसआयवर गुन्हा

प्रेमसंबंध असलेल्या तरुणीसोबत नोंदणी पद्धतीने विवाह करून, काही काळाने तरुणीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास नकार देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणी अनुसूचित जातीची असल्याने नकार दिलाः तसेच वेळोवेळी दहा ते बारा लाख रुपये घेतले. बलात्कार आणि बेकायदेशीर गर्भपात असे गुन्हे दाखल होण्याचे टाळण्यासाठी पूर्वनियोजन करून फसवणूक केल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी एका 28 वर्षांच्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फलटण येथील गोखली गावातील 32 वर्षीय तरुणासह त्याचा भाऊ आणि वडील यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 30 सप्टेंबर 2020 ते 2025 या काव्ळात झाला आहे.

तरुणाची नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. त्या वेळी त्याची आणि फिर्यादी तरुणीची ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने तरुणीशी नोंदणी पद्धतीने लग्न केले. मात्र, त्याबद्दल त्याने कुटुंबीय आणि मित्र परिवारात सांगितले नाही; तसेच तिला समाजात पत्नी म्हणून ओळख दिली नाही. ‘लग्नाबद्दल घरी सांगतो,’ असा विश्वास दाखवून त्याने तरुणीकडून वेळोवेळी 10 ते 12 लाख रुपये घेतले.

आरोपीची उपनिरीक्षकपदी निवड झाल्यावर तरुणीने लग्नाबाबत कुटुंबीयांना सांगण्याची विनंती केली, तेव्हा आरोपीने टाळाटाळ केली, ‘घरचे माझ्यासाठी स्थळ पाहात आहेत. तुझ्या जातीमुळे माझ्या घरचे तुझा स्वीकार करणार नाहीत. त्यांना आपले लग्न मान्य होणार नाही. तू माझा विचार विचार सोडून दे,’ असे म्हणत आरोपी तक्रारदार तरुणीपासून दूर राहू लागला. यानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. विश्रामबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.