Pune news – प्रभागरचनेवर हरकतींचा पाऊस; एकाच दिवसात 785 हरकती; आत्तापर्यंत 1382 हरकती, तर 8 प्रभागांत भोपळा

महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर आत्तापर्यंत १३८२ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. गेल्या १० दिवसांत महापालिकेकडे फक्त ५९५ हरकती नोंदविल्या होत्या. मात्र, आज एकाच दिवसात प्रभागरचनेवर तब्बल ७८५ हरकती नोंदविण्यात आल्या. यामध्ये प्रभाग क्रमांक ३ विमाननगर-लोहगाव येथून ३८१, प्रभाग क्रमांक ३४ नन्हे-वडगाव बुद्रुक येथून २७८ आणि प्रभाग क्रमांक १५ मांजरी बुद्रुक साडेसतरा नळी येथून २२४ अशा एकूण तब्बल १३८२ हरकती आल्या आहेत. तर, ४१ पैकी आठ प्रभागांतून एकही हरकत आली नसून, इतर प्रभागांमधील हरकतींची संख्या कमी आहे.

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी २२ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली. यामध्ये ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. ४० प्रभाग हे चारसदस्यीय असून, एक प्रभाग पाचसदस्यीय संख्येचा असणार आहे. २३ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत हरकती-सूचना मागविण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवामध्ये सध्या तरी नागरिकांकडून आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून कमी प्रमाणात हरकती दाखल होत होत्या. मात्र, मुदत संपत येताना आता हरकतींची संख्या वाढू लागली आहे. आतापर्यंत पालिकेकडे प्रारूप प्रभागरचनेवर आतापर्यंत १३८२ हरकती आणि सूचना आलेल्या आहेत.

दरम्यान, प्रभागरचना भाजपच्या फायद्याची तयार करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला असून, या प्रभागरचनेच्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. सध्या जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती मागविण्यात आल्या असून, अनेक प्रभागांत मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या आहेत.

एका दिवसात ७८५ हरकती प्राप्त

प्रभागरचनेच्या आराखड्यावर हरकती नोंदविण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आली आहे. २२ ऑगस्ट रोजी प्रभागरचनेची घोषणा करण्यात आली. त्याच दिवसापासून हरकती नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली. गेल्या १० दिवसांत महापालिकेकडे फक्त ५९५ हरकती नोंदविण्यात आल्या. मंगळवारी (२ रोजी) एकाच दिवसात प्रभागरचनेवर ७८५ हरकती नोंदविण्यात आल्या. आता हरकती नोंदविण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत हरकतींची संख्या वाढू शकते.

या प्रभागांतून एकही हरकत नाही

प्रभाग ५ – कल्याणीनगर-वडगाव शेरी, प्रभाग १० बावधन-भुसारी कॉलनी, प्रभाग १२ शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी, प्रभाग २५ – शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई, प्रभाग २९ डेक्कन जिमखाना-हॅपी कॉलनी, प्रभाग ३० कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी, प्रभाग ३१ मयूर कॉलनी-कोथरूड, प्रभाग ४० कोंढवा बुद्रुक येवलेवाडी या प्रभागांचा समावेश आहे.

सुनावणींसाठी व्ही. राधा यांची नियुक्ती

पुणे महापालिकेच्या प्रभागरचनेवरील हरकती आणि सुनावणीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.