बारामती, दौंड, इंदापुरात पावसाचा कहर; मंदिरे, घरे, रस्ते पाण्याखाली

हवामान खात्याने पुणे शहरासह जिह्याला 27 मेपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता. जिह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार शनिवारी रात्रीपासूनच जिह्यातील काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली होती. रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने रविवारची सकाळ उजाडली तरी विश्रांती घेतली नाही. इंदापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. भिगवण, स्वामी चिंचोली, म्हसोबाचीवाडी या भागांत पावसाचा जोर अधिक असल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या भागांतील मंदिरे, घरे, रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. भिगवण येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतचा सर्व्हिस रोड तीन किलोमीटर अंतरापर्यंत पाण्याखाली गेला आहे. दरम्यान बाणगंगा नदीला पूर आला.

यवत परिसरात दाणादाण

गेल्या दोन दिवसांपासून यवत परिसरात पावसाने हाहाकार माजविला आहे. दोन दिवसांत 120 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नद्या, ओढ्यांवरील बंधारे धोक्यात

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नदी, ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. काही बंधाऱ्यांना लोखंडी गेट लावले असल्यामुळे पाण्याचा भिंतीवर दबाव येत आहे. त्यामुळे बंधारे धोक्यात आले आहेत. जिह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. जिह्यातील फलटण, पाटण, कराड, माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा, वाई व महाबळेश्वर तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे.

भिगवण परिसर जलमय

भिगवण परिसरात रविवारी पावसाने जोरदार ‘बॅटिंग’ केली. त्यामुळे भिगवण परिसर जलमय झाला आहे. थोरातनगरमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पुणे-सोलापूर महामार्गावरील बस स्थानक जलमय झाले.

धुवाधार आणि संततधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी पंचगंगा नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धरण क्षेत्रात अतिवृष्टीमुळे धरणांच्या आणि नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

बारामतीत नीरा कालव्याला भगदाड

बारामती तालुक्यातील लिमटेक परिसरात नीरा डावा कालवा फुटल्याची घटना घडली आहे. कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कालवा फुटून हे पाणी घरांमध्ये, तसेच शेतांत शिरले आहे. गेल्या तीन दिवसांपासून बारामती, पिंपळी, लिमटेक, काटेवाडी परिसरांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. हे पाणी कालव्यात शिरल्याने पाण्याच्या वाढलेल्या दाबामुळे नीरा डाव्या कालव्याला लिमटेकजवळ भगदाड पडले आहे.

कालव्याची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर ‘एनडीआरएफ’ची दोन पथके बारामतीच्या दिशेने रवाना झाली आहेत. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात असून, रात्रीची स्थिती पाहून पथकांना तेथून हटविले जाईल, अशी माहिती ‘एनडीआरएफ’चे असिस्टंट कमांडंट यांनी दिली.