
खराडीतील कथित ड्रग्ज पार्टीत प्रांजल खेवलकर यांनी अमली पदार्थांचे सेवन केले नव्हते, असा निष्कर्ष फॉरेन्सिक तपासणीत निघाल्याने प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती व माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई असलेल्या खेवलकर यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 27 जुलै रोजी पोलिसांनी खराडीतील हॉटेलवर छापा टाकून खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक केली होती. ठिकाणावरून कोकेन व गांजा जप्त केला होता.
अटकेनंतर आरोपींचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यात खेवलकर यांच्याकडून ड्रग्ज सेवनाचे पुरावे मिळाले नाहीत. तथापि, पोलिसांनी सादर केलेल्या चार्जशीटमध्ये त्यांच्या इन्स्टाग्राम चॅटमध्ये ड्रग्ज मागवण्याचे संदेश असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे सेवनाच्या आरोपातून ते मुक्त झाले असले, तरी पार्टीचे आयोजन व पुरवठय़ाचा तपास सुरू आहे. खेवलकर यांना 25 सप्टेंबर रोजी जामीन मिळाला असून ते दीड महिन्याहून अधिक काळ तुरुंगात होते.