Pune news -कात्रज–कोंढवा भागात विजेच्या तारा तुटल्याने मोठा ब्लॅकआऊट, पहाटे पाचपासून वीजपुरवठा खंडित; नागरिक हैराण

कात्रज–कोंढवा परिसरात विजेच्या तारा तुटल्याने आज पहाटे ५ वाजल्यापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला आहे. तब्बल दहा तासांहून अधिक काळ वीज नसल्याने परिसरातील अनेक सोसायट्यांतील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे घरगुती कामकाज, पाणीपुरवठा, लिफ्ट सेवा तसेच ऑनलाइन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. काही सोसायट्यांमध्ये जनरेटरची व्यवस्था अपुरी असल्याने वृद्ध, लहान मुले आणि आजारी नागरिकांचे हाल होत आहेत.

महावितरणकडून तारा तुटल्याची माहिती देण्यात आली असली तरी दुरुस्तीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वारंवार होणाऱ्या वीज खंडित प्रकारांमुळे कात्रज–कोंढवा भागातील वीज यंत्रणेच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महावितरणने तातडीने पर्यायी व्यवस्था व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.