
सामना प्रतिनिधी, मुंबई
जगाच्या कोणत्याही घडामोडीवर पुणेकरांचे स्वतःचे असे ठाम मत असते. असेच परखड मत त्यांनी आपल्या आवडत्या ‘डेक्कन क्वीन’च्या नूतनीकरणाबाबतही मांडले आहे. पुणेकरांना डेक्कन क्वीनची ओळख असलेली ‘डायनिंग कार’ तर कायम हवीच; परंतु तिची विशिष्ट ओळख असलेला निळा आणि पांढरा रंगही बदलण्यास 80 टक्के प्रवाशांनी विरोध केला आहे. डेक्कनला आधुनिक एलएचबी कोच लावण्याची योजना होती; परंतु एलएचबीची ‘डायनिंग कार’ आणायची कोठून याचे कोडे मध्य रेल्वेला पडले आहे.
एकीकडे रेल्वे मंत्रालयाने जुन्या गाडय़ांचा कायापालट करण्यासाठी ‘उत्कृष्ट रेक’ योजना धडाक्याने सुरू केली आहे. त्यामुळे पंचवटीच्या धर्तीवर डेक्कन क्वीनचा विकास करणाऱ्या मध्य रेल्वेची पुणेकरांनी चांगलीच भंबेरी उडविली आहे. पुणे ते मुंबई रोजचा प्रवास करणाऱया 70 ते 80 टक्के नागरिकांनी एका सर्व्हेक्षणात 88 वर्षे जुन्या या ‘दख्खनच्या राणी’च्या नूतनीकरणाला विरोध केला आहे. प्रवाशांना या गाडीचा निळा व पांढरा हा रंग कायम हवा आहे. तर तिची स्पेशालिटी असलेली ‘डायनिंग कार’ ही कायम ठेवण्याची मागणी केली आहे.
चालते उपाहारगृह ही ‘डेक्कन क्वीन’ची खासियत
केवळ पॅलेस ऑन व्हील्स, डेक्कन ओडीसीत अशी सुविधा
डायनिंग कारमध्ये प्रवाशांचा जेवणाचा आनंद
1 जून 1930 रोजी डेक्कन क्वीनची सुरुवात
नव्या रूपात कमी प्रवासी बसणार
अलीकडेच मनमाड पंचवटी एक्स्प्रेसचा कायापालट करून नवे अत्याधुनिक लिंके हॉफमेन बुस (एलएचबी) कोच बसवण्यात आले आहेत. राजधानीच्या धर्तीचे असे एलएचबी कोच ‘डेक्कन क्वीन’ला बसविण्याची योजना आहे. परंतु एलएचबी कोचची निर्मिती करणाऱ्या आयसीएफ फॅक्टरीत एलएचबीची ‘डायनिंग कार’ उपलब्ध नसल्यानेही अडचण निर्माण झाली आहे. शिवाय एलएचबी डब्यांमुळे आसनांची संख्याही घटत असल्याने यातून मार्ग कसा काढायचा यावर खलबते सुरू आहेत.


























































