
स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस आणून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चार पीडित तरूणींची सुटका केली. बाणेर भागातील स्पंदन स्पा येथे ही कारवाई करण्यात आली.
शहरात मसाज सेंटरच्या नाखाखाली वैश्याव्यवसाय तसेच इतर अवैध धंद्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. कारवाईसाठी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक गस्तीवर होते. या दरम्यान बाणेर भागातील बालेवाडी रस्त्यावर स्पंदन स्पा येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली.
यानुसार पथकाने सापळा रचून संबंधीत ठिकाणी छापा टाकला. यावेळी येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी स्पा मालकाला ताब्यात घेतले आहे. तर, चार पिडीत तरूणींची सुटका केली. आरोपीवर चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, आश्विनी पाटील, अंमलदार अजय राणे, अण्णा माने, प्रमोद मोहीते, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

























































