
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून सहावी आलेल्या व वनअधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या दर्शना पवार हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल हंडोरे याला अटक केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
18 जून रोजी 26 वर्षीय दर्शना पवार हिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला सतीचा माळ परिसरात सापडल्याने खळबळ उडाली होती. दर्शना ही अखेरची राहुल सोबत राजगडावर जाताना दिसली होती. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात राहुल एकटाच गडावरून खाली येताना दिसत होते. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होती. अखेर बुधवारी पोलिसांना राहुलला अटक करण्यात यश आलं.
दर्शनाच्या मृत्यूपासून राहुल हंडोरे हा बेपत्ता असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथकं त्याचा शोध घेत होती. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरयाणा अशा राज्यांमध्ये ही पथकं त्याचा शोध घेत होते. मात्र अखेर बुधवारी राहुलला पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे. अटकेनंतर राहुलने दर्शनाची हत्या केल्याची कबूली दिल्याचे समजते.
दर्शना पवार व राहुल हंडोरे हे नातेवाईक असून ते पुण्यात एकत्र एमपीएसस्सीची तयारी करत होते. राहुलला दर्शनासोबत लग्न करण्याची इच्छा होती. मात्र दर्शनाच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवले होते. त्यामुळेच संतापलेल्या राहुलने दर्शनाची हत्या केल्याचे समजते.


























































