पुणे – पानशेत धरण भरेल एवढे पाणी मुठा नदीत सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खडकवासला धरण साखळीतील चार धरणे पूर्णपणे भरून पानशेत धरण 100% भरेल एवढे पाणी मुठा नदीत सोडल्याने ते वाहून गेले. पानशेत धरणाचा एकूण उपयुक्त पाणीसाठा 10.65 टीएमसी एवढा असून, प्रत्यक्षात प्रकल्पातून वाहून गेलेले पाणी 10.80 टीएमसी आहे.

गेल्या वर्षी देखील खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला होता. सर्व धरणे भरल्याने जवळपास 18 टीएमसी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. विशेष म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 98 टक्यांपर्यंत साठवून होता. यंदा आजमितीस या चारही धरणांमध्ये मिळून 28.98 टीएमसी म्हणजेच 99.42 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.गेल्यावर्षी याच दिवशी तो 29.15 टीएमसी एवढा होता.

खडकवासला प्रकल्पातील खडकवासला पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. फक्त पूर पातळी स्थिर ठेवण्यासाठी खडकवासला आणि टेमघर धरणातील पाणीसाठा 12 टक्क्यांनी नियंत्रित केला जात आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने 75 टक्यांपेक्षा जास्त पाणी साठा धरणांमध्ये आला. गेल्यावर्षीचा 23 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे यंदा जरी 10.80 टीएमसी पाणी प्रकल्पातून सोडले असले तरी प्रत्यक्षात गतवर्षीचा शिल्लक पाणीसाठा विचारात घेता धरणांमधील पाण्याची स्थिती यंदादेखील समाधानकारक राहिली आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे काठोकाठ भरलेली असून दुष्काळी भागातील नाजरे आणि घोड धरणांमध्ये देखील शंभर टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस सुरू असल्याने सध्या तरी पाण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत नसल्याचे कृष्णा खोरे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

संपूर्ण कृष्णा खोरे तुडूंब
यंदाच्या पावसाने संपूर्ण कृष्णा आणि भीमा कोरे तुडुंब भरले आहे. या खोऱ्यातील 36 धरणे मिळून 418 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तो उपलब्ध क्षमतेच्या 98.06 टक्के इतका आहे. त्यामध्ये 212.35 टीएमसी म्हणजे 97.88 टक्के तर कृष्णा खोऱ्यात 206.88 टीएमसी म्हणजेच 98.25 टक्के इतका पाणीसाठा आहे.

उजनी मध्ये 109 टक्के पाणीसाठा
चालू हंगामातील पावसाचे वैशिष्ट्य असे की भीमा खोऱ्यातील सर्वात मोठे एकूण 117 टीएमसी क्षमतेचे उजनी धरण जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच भरत गेले भीम आणि मुळा-मुठा या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यातील पाणी उजनी धरणाला दिल्याने यांना धरण लवकर भरले सध्या उजनी मध्ये एकशे नऊ टक्के हा क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा ठेवण्यात आला आहे.