
शहरात रिक्षाचालकांची मग्रुरी कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये रिक्षाचालकांबद्दल चर्चा आहे. कागदपत्रे नसल्यामुळे संबंधित रिक्षाचालकावर कारवाई करणाऱ्या वाहतूक शिपायाला रिक्षाचालकाने मारहाण केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. याप्रकरणी रिक्षाचालक बाबुशा साईनाथ कीर्तीवार (वय 22, रा. विश्रांतवाडी) याला अटक करण्यात आली. येरवडा वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई अनिल मन्हाळकर यांनी यासंदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रेल्वे स्थानकातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्यापार्श्वभूमीवर बेकायदा रिक्षा व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आळंदी रस्त्यावर बोपखेल फाट्याजवळ रिक्षाचालक कीर्तीवार याला पोलीस शिपाई मन्हाळकर यांनी थांबविले. त्याच्याकडे वाहन परवान्यासह कागदपत्रांची मागणी केली. तेव्हा त्याच्याकडे कागदपत्रे नसल्याचे उघडकीस आले. त्याला मन्हाळकर यांनी येरवडा वाहतूक विभागात रिक्षा नेण्यास सांगितले. मन्हाळकर रिक्षात बसले. विश्रांतवाडी चौकात कीर्तीवारने रिक्षा थांबवून मन्हाळकर यांना लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरूवात केली. झटापटीत मन्हाळकर यांचा मोबाइल पडला. रिक्षातून पसार होण्याच्या प्रयत्नात असताना मन्हाळकर यांच्या पायाला रिक्षाचे चाक घासून गेले. सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण तसेच धमकावल्याप्रकरणी रिक्षाचालक कीर्तीवारला अटक करण्यात आली.
बेशिस्त दुचाकीस्वाराने घेतला अमंलदाराचा चावा
पुणे सिग्नलचा भंग करून दुचाकी चालविणाऱ्याला थांबविल्याच्या रागातून संबंधिताने पोलीस अमलदाराला दगडाने मारहाण करून चावा घेतल्याची धक्कादायक घटना 20 सप्टेंबरला मध्यरात्री दीडच्या सुमारास एरंडवण्यातील काळभैरव मंदीर चौकात घडली. याप्रकरणी मंगेश शमाकांत काळे (वय 29, रा. एरंडवणा ) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अमलदारा परमेश्वर पाडळे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


























































