ससून रुग्णालयाचा गलथान कारभार, आयसीयूमध्ये उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू; मृताच्या नातेवाईकांचा आरोप

ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असताना उंदीर चावल्यामुळे सागर रेणुसे या 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, या प्रकरणी रुग्णालय आणि संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे, तर अपघातामध्ये मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचा दावा करत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे ससून प्रशासनाने म्हटले आहे.

सागरचा 15 मार्चला रात्री 10 वाजता अपघात झाला होता. त्यानंतर त्याला 16 मार्च रोजी रात्री उशिरा उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. अपघातात त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. प्रकृती खालावल्यामुळे तो रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. याठिकाणी उपचार सुरू असताना उंदीर चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. स्वतः सागरनेच उंदीर चावल्याचे सांगितले होते, असा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला, तर रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्यामुळे त्याला बोलता येणे शक्य नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

पुन्हा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर

सर्वसामान्यांचा आधार असलेले ससून रुग्णालय या-ना त्या कारणांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱयात सापडत आहे. ललित पाटील प्रकरणामुळे ससूनमधील भोंगळ कारभार हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. त्यातच अपुरे मनुष्यबळ, स्वच्छतेचा अभाव त्यामुळे याठिकाणी उपचारासाठी येणाऱया रुग्णांची होणारी हेळसांड हा रुग्णालयातील गंभीर प्रश्न आहे. त्यातच आता या उंदीर प्रकरणामुळे पुन्हा ससून रुग्णालयातील भोंगळ कारभार आणि स्वच्छतेचा प्रश्न चव्हाटय़ावर आला आहे.

घटनेची चौकशी करणार

अपघातामध्ये या रुग्णाच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. दोन्ही पाय निकामी झाले होते. 25 मार्चला या रुग्णावर शस्त्रक्रिया केली. 29 मार्चपासून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले होते. रुग्णाला उंदीर चाकला अशी तक्रार त्याच्या नातेकाईकांनी सोमकारी सकाळी केली. रुग्णाचा मृत्यू सोमवारी रात्री झाला. मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या घटनेची चौकशी करणार असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी सांगितले, तर गंभीर अपघात झाल्याने रुग्णाच्या शरीरावर मोठय़ा प्रमाणावर जखमा झाल्या होत्या. शरीरावर उंदराने चावा घेतल्याच्या खुणा आढळल्या नाहीत, असे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी सांगितले.