मावळात महायुतीचा उमेदवार 2 लाखांच्या मताधिक्याने जिंकेल

सामना प्रतिनिधी। पिंपरी

देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद मोदी यांना पुन्हा विराजमान करणे गरजेचे आहे. त्यामुळे शिवसेना – भाजप – रिपाइं महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासमवेत असलेल्या मतभेदांना पूर्णविराम दिला आहे. दहा वर्षांत निर्माण झालेले गैरसमज संपुष्टात आणले आहे, अशी ग्वाही भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली. मावळ मतदारसंघात शिवसेना – भाजप – रिपाइं महायुतीचा विजय निश्चित असून दोन लाखांच्या मताधिक्याने श्रीरंग बारणे निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना – भाजप – रिपाइं महायुती पदाधिकाऱयांची संयुक्त पत्रकार परिषद आज पिंपरी येथे पार पडली. त्यावेळी आमदार लक्ष्मण जगताप बोलत होते. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर केलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित होते. आमच्यात कोणतेही वैयक्तिक वितुष्ट नव्हते. आमच्यात सामंजस्य घडावे यासाठी शिवसेना नेते, पुणे विभागीय संपर्कनेते खासदार संजय राऊत, उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱहे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गिरीश बापट, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ऍड.सचिन पटवर्धन, माजी नगरसेवक ऍड. अमर मूलचंदानी यांनी प्रयत्न केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिकरीत्या संपर्क साधून दोघांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

मतभेद होते मनभेद नव्हते

आमदार जगताप म्हणाले, दुसऱयाची चूक शोधण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे उत्तम आहे. त्यानुसार आम्ही आत्मपरीक्षण केले आहे. आम्हा दोघांमध्ये मतभेद होते, मनभेद नव्हते. कोणत्याही प्रकारचा व्यक्तिगत आकस नव्हता. देश आणि पक्षहित पाहून एक पाऊल आपण मागे घेत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्यातील ’इगो’ बाजूला ठेवायला सांगितले आहेत. देशहित महत्वाचे असल्याच्या सूचना आम्हा दोघांनाही केल्या आहेत. त्यामुळे आम्ही दोघांनीही एक – एक पाऊल मागे जायचे ठरविले आहे. आम्हा दोघांचे मनोमिलन झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या