
इमारतीत दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या चोरट्याला प्रतिकार केल्यामुळे त्याने तरूणाच्या दिशेने गोळीबार केला. त्याशिवाय तरूणाचा चावा घेतल्यानंतरही धाडसी तरूणाने त्याला पकडून ठेवून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना गुरूवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोरपडे पेठेतील हीना टॉवरमध्ये घडली. विठ्ठल वामन भोळे (वय 46, रा. हडपसर, मूळ-भादली, जळगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आवेज सलीम अन्सारी (वय 23, रा. हीना टॉवर) असे किरकोळ जखमी झालेल्याचे नाव आहे.
घोरपडे पेठेतील हीना टॉवरमध्ये अन्सारी कुटूंबिय राहायला आहेत. गुरूवारी सकाळी ते मुंबईहून पुण्यात आल्यानंतर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर थांबले होते. त्यावेळी पहिल्या मजल्यावरील भावाच्या फ्लॅटमधून आवाज येत असल्यामुळे आवेज खाली आले. त्यावेळी त्यांना फ्लॅटमध्ये चोरटा कपाटामध्ये दागदागिने शोधत असल्याचे दिसून आले. चोरट्याने बंदूक काढून आवेज यांना जागेवरच थांबायला सांगितले. त्यामुळे आवेज हालचाल न करता थांबले होते. मात्र, चोरट्याने पळून जाण्याच्या प्रयत्न करीत असताना आवेजने त्याच्या अंगावर झडप मारली. त्यावेळी चोरट्याने पिस्तूलाने दोन राउंड फायर करीत आवेजला चावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आवेज यांनी धाडसाने त्याला पकडून ठेवले. त्यानंतर जमलेल्या नागरिकांनी चोरट्याला मारहाण करून पोलिसांना माहिती दिली. खडक पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सोमनाथ ढगे आणि सहायक पोलीस फौजदार अजिज बेग यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेउन आरोपीला ताब्यात घेतले.
पुण्यात चोरी करून विकत घेतले होते पिस्तूल
आरोपी विठ्ठल भोळे याच्याविरूद्ध भुसावळमधील बाजारपेठ पोलीस ठाण्यातंर्गत खूनाचा गुन्हा दाखल आहे. त्याने भोजराज भारंबे यांचा खून केला होता. संबंधित गुन्ह्यातून 8 जुलैला तो नाशिक कारागृहातून पॅरोलवर सुटला होता. त्यानंतर एक महिन्यांपुर्वी विठ्ठल पुण्यातील हडपसरमध्ये आला. त्याने सोलापूर रस्त्यावरील घरामध्ये चोरी केली. मिळालेल्या चोरीच्या ऐवजातून त्याने मध्यप्रदेशातील उमर्टी येथून सात राउंडचे पिस्तूल 20 हजार रूपयांमध्ये विकत घेतले होते.
खडकमाळ आळी परिसरातील हीना टॉवर इमारतीत चोरटा चोरी करण्याच्या उद्देशाने शिरला होता. त्यावेळी तेथे गेलेल्या तरूणाने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चोरट्याने दोन वेळा राउंड फायर केले. त्याशिवाय तरूणाच्या हाताचा चावा घेत जखमी केले. आरोपीविरूद्ध घरफोडीचे गुन्हे असून त्याच्याकडून जिंवत राउंड आणि पिस्तूल ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे – श्रीहरी बहिरट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस ठाणे
कोट-फ्लॅटमध्ये चोर चोरी करीत असताना मला पाहताच त्याने बंदूक बाहेर काढली. मात्र, मी हिंमत न हारता त्याच्या अंगावर झडप मारली. त्यानंतर त्याने चाकू काढून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, मी चोरट्याला घट्ट पकडल्यामुळे त्याला हालचाल करता आली नाही. त्यानंतर स्थानिक आणि पोेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आवेज अन्सारी, चोरट्यासोबत झटापट झालेला तरूण


























































