पुणे – खुनाच्या गुन्हयात फरार असलेल्या दोघांना बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तरूणाचा खून करून फरार झालेल्या आणखी दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही घटना 13 डिसेंबरला आंबेगाव खुर्दमध्ये घडली होती. उपचारादरम्यान 19 डिसेंबरला तरूणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हल्ल्यातील आरोपींचा पोलिसांनी शोध घेउन अटक केली.

दत्ता राहुल कदम ( वय 22 रा. साईलिला अपार्टमेंन्ट, साई मंदीराजवळ, आंबेगाव खुर्द) आणि अजय सदाशिव रेणुसे (वय 24 रा. गणपती मंदीराजवळ, आंबेगाव खुर्द ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रकाश निवृत्ती रेणुसे (वय 27 रा. कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे.

जुन्या वादातून हल्लेखोरांनी प्रकाशला रॉडने आणि दगडांनी मारून जखमी केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत होता. आरोपी दत्ता आणि अजय हे जुना कात्रज बोगद्याजवळ थांबले असून ते नातेवाईकांना भेटून जाणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे, चेतन गोरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना अटक केले. ही कामगिरी पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील, एसीपी सुषमा चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली.