देर्डे- सिन्नर 60 मीटरचा रस्ता 45 मीटर करून गावाकडे वळवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कोपरगाव

राज्य मार्ग 160 देर्डे फाटा ते सिन्नर हा 60 मीटर रस्ता 45 मीटर करून गावाकडे वळवण्यात आल्याने याविरोधात देर्डे-कोऱ्हाळे ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले. मात्र
शिवसेनेने मध्यस्थी करत नायब तहसीलदाराक़डून लेखी हमी घेतली यामुळे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

राज्य मार्ग 160 देर्डे फाटा ते सिन्नर या रस्त्याचे नूतनीकरणाचे काम प्रस्थापित असून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (N.H.A.I) अंतर्गत रस्त्याचे काम होणार आहे, देर्डे फाटा ते सिन्नर हा रस्ता सुरुवातीला 60 मीटर. अंतर मोजला होता. पण अचानक हा रस्ता 45 मीटर करुन 40 फुट गावाकडे वळवण्यात आला.यामुळे गावातील वेस, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे गाळे, बौध्द विहाराची जागा,शनी मंदीर, तसेच व्यावसायिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून पूर्वी मोजणी झालेल्या अंतरावरच रस्त्याचे काम व्हावे याकरीता देर्डे -कोऱ्हाळे ग्रामस्थांनी 1 जानेवारी पासुन आमरण उपोषण सुरू केले होते. बुधवारी दिनांक 2 जानेवारी रोजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे तसेच नायब तहसीलदार शिवाजी ससुरे यांनी मध्यस्थी करून प्रांतकार्यालयातील आधिकाऱ्यांशी बैठक करुन व वस्तुस्थिती समोर आणली. त्यानंतर त्यांच्याकडून योग्य निर्णय घेण्याचे लेखी पत्र घेतले. त्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.

यावेळी अशोकराव डुबे मा. सरपंच संध्याताई डुबे, सरपंच योगिराज देशमुख, कचेश्वर डुबे, गौतम दिघे, उपसरपंच सुनिता दिघे,उध्ववराव शिलेदार,कृष्णा शिलेदार, काशीनाथ बैरागी,विकास डुबे, उमाकांत शिलेदार ,नितीनराव वडांगळे, सुरेश शिलेदार, केशवराव विघे,व राजेंद्र शिंदे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

रस्त्याची कामे होणे महत्त्वाचे आहेच, मात्र जाणीवपुर्वक कुणावरही अन्याय होत असेल तर त्यांच्या पाठीशी शिवसेना उभी राहते. या रस्त्याचे काम व्हावे अशीच आमची भूमिका असल्याचे प्रमोद लबडे यांनी सांगितले.