
जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी लोहियानगर येथील मामुडी चौकाजवळ घडली. करण कालिदास साळवे (वय 22) याला अटक करण्यात आली. याप्रकरणी साहिल बागवान (वय 21) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
करण आणि साहिल यांचे 2016 साली भांडण झाले होते. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून न्यायालयात प्रकरण दाखल आहे. साहिल 2 फेब्रुवारीला मामूडी चौकाजवळ थांबला असताना करण त्याच्याजवळ आला. त्याला करणने 2016 च्या केसचे काय झाले ? केस कधी बोर्डावर येणार आहे ? अशी विचारणा केली. त्यावर साहिलने अजून मला कोर्टाचे समन्स आले नाही असे सांगितले. त्याच्या राग आल्याने करणने साहिलला तुझी आज विकेटच पाडतो असे म्हणून त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. यामध्ये साहिल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने तपास करत आहेत.































































