
कोयत्याचा धाक दाखवून तरुणाच्या खिशातील रोकड आणि मोबाईल चोरणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केले. ही घटना संध्याकाळी सातच्या सुमारास येरवड्यातील यशवंतनगरमध्ये घडली.
नीलेश उर्फ पिन्या संजय साळवे (वय 21) आणि राकेश उर्फ सुरेश साळवे (वय 22, दोघेही रा. यशवंतनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय गोरखे (वय 24, रा. वाघोली ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी सातच्या सुमारास अक्षय येरवड्यात त्यांच्या घराचे भाडे आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी नीलेश उर्फ पिन्या आणि राकेश उर्फ सुरेश हातात कोयता आणि बांबू घेउन मोठमोठ्याने आरडा-ओरडा करीत होते.
त्यांनी अक्षयला थांबवून कोयत्याचा धाक दाखविला. त्याच्या खिशातील 80 रुपये आणि मोबाईल काढून घेत मारहाण केली.
त्यानंतर आरोपींनी कामावरुन घरी जात असलेल्या समीर कुरेशी यांनाही धमकाविले आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस तपास करीत आहेत.



























































