न्यायालयाचा अजब निर्णय; कोंबड्याने दिलं अंडं, सुनावली जिवंत जाळण्याची शिक्षा

69

सामना ऑनलाईन । लंडन

न्यायालयात आरोपींविरोधात खटले चालतात. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचे म्हणणे समजून घेऊन न्यायाधीश निकाल देतात. मात्र, काही न्यायालये अशी आहेत ज्यात चक्क प्राण्यांवर खटले दाखल झाले असून त्यांना शिक्षाही सुनावण्यात आली आहे. ‘ द क्रिमीनल प्रोसेक्युशन अॅण्ड कॅपिटल पनिशमेंट ऑफ अॅनिमल’ या के. डब्लू. हेनमन यांच्या 1906 साली लंडनमध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात प्राण्यांविरोधात चालवण्यात आलेले खटले आणि त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षांचा समावेश आहे. न्यायालयीन खटल्यांबाबत अनेक पुस्तके बाजारात येतात. मात्र, प्राण्यांवरील खटल्यांबाबत बाजारात आलेले हे एकमेव पुस्तक आहे.

एका नवजात बालकाच्या हत्येप्रकरणी 1386 मध्ये एका डुकराला दोषी ठरवण्यात आले असून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेची अमंलबजावणी करण्यापूर्वी त्याला आरोपींसारखे कपडे घालण्यात आले होते. तसेच त्याचा चेहरा काळ्या कपड्याने झाकण्यात आला होता. फ्रान्समध्ये 14 जून 1494 मध्ये एका डुकराला अटक करण्यात आली होती. पाळण्यात खेळणाऱ्या एका लहान मुलावर हल्ला करून त्याची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होता. हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे एका वकिलाने डुकराच्या बाजूने युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे एकल्यावर न्यायालयाने डुकराला फाशीची शिक्षा सुनावली.

लंडनमध्ये 1314 मध्ये एका पादचाऱ्यावर बैलाने हल्ला केला होता. त्यात पादचारी गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी बैलावर न्यायालयात खटला चालवण्यात येऊन त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. एका कोंबड्याने अंडे देण्याचा अनैसर्गिक आणि प्रकृतीविरोधातील गुन्हा 1474 मध्ये केला होता. स्वित्झर्लंडमधील एका न्यायालयाने त्याला जिवंत जाळण्याची शिक्षा सुनावली होती. फ्रान्समध्ये 16 व्या शतकात शेतातील धान्य नष्ट केल्याप्रकरणी उंदरांवर खटला दाखल करण्यात आला होता. न्यायालयात एका वकिलाने उंदरांची बाजू मांडली. गावातील गल्लीबोळांमध्ये असलेल्या मांजरांच्या भीतीमुळे आपले अशील न्यायालयात हजर होऊ शकत नाही. त्यांच्यात रस्त्यातच माजरांकडून हल्ला होऊ शकतो. त्यांच्या जीवाला धोका असल्याने ते न्यायालयात उपस्थित राहू शकत नाही. न्यायालयाने वकीलाची बाजू मान्य करत उंदरांना शिक्षा सुनावली नाही.

अमेरिकेत सप्टेंबर 1816 मध्ये सर्कसदरम्यान ट्रेनरची हत्या करणाऱ्या मेरी नावाच्या एका हत्तीणीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ट्रेनरची हत्या केल्याच्या आरोपाखाली तिच्यावर खटला दाखल करण्यात आला. टेनेसीजवळील अरवीन गावात तिला फाशी देण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिले होते. ब्राझीलमध्ये 1713 मध्ये ढेकणांविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. चर्चची मौल्यवान संपत्ती नष्ट केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

आपली प्रतिक्रिया द्या