5 कोटी रोख, दीड किलो सोनं, लक्झरी कार अन्… पोलीस उपमहानिरीक्षकांच्या घरात सापडलं घबाड; लाचखोरी प्रकरणात अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबचे पोलीस उपमहानिरीक्षक हरचरण सिंग भुल्लर यांना 5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर सीबीआयने त्यांच्या मोहाली येथील घरावर, कार्यालयावर आणि अन्य ठिकाणांवर छापेमारी केली. या छापेमारीमध्ये सीबीआयला घबाड सापडले आहे. हरचरण सिंग भुल्लर यांच्या घरातून 5 कोटी रुपयांची रोकड, दीड किलो सोने आणि लक्झरी कार जप्त करण्यात आल्या आहेत. अद्यापही नोटांची मोजदाद सुरू असल्याची माहिती मिळतेय.

पोलीस उपमहानिरीक्षक हरचरण सिंग भुल्लर यांनी एका भंगाराच्या व्यापाऱ्याकडे 8 लाख रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी 11 ऑक्टोबर रोजी चंदीगड येथील सीबीआय कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली. हरचरण सिंग आपल्याला धमकी देत असून त्यांनी आपल्यावर खोटा खटला दाखल केला आहे. हा खटला निकाली काढण्यासाठी 8 लाख रुपयांची लाच मागितली, असा आरोप तक्रारदाराने केला. या तक्रारीच्या आधारे सीबीआयने कारवाई सुरू केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर सीबीआयने पोलीस उपमहानिरीक्षक हरचरण सिंग भुल्लर यांच्यावर पाळत ठेवली. भंगाराचा व्यापारी लाचेचा पहिला हप्ता 5 लाख रुपये त्यांना देत असताना सीबीआयच्या पथकाने छापा टाकला आणि हरचरण सिंग भुल्लर यांना रंगेहाथ पकडले. चंदीगड येथील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली होती. यावेळी एका मध्यस्थालाही बेड्या ठोकण्यात आल्या.

सीबीआय चौकशीत असेही समोर आले की पोलीस उपमहानिरीक्षक भुल्लर यांनी फक्त लाचेचीच मागणी केली नव्हती तर दर महिन्याला 5 लाख रुपये देण्याचीही मागणी केली होती. यानंतर सीबीआयने भुल्लर यांच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली. सीबीआयने भुल्लर यांच्या चंदीगड, रोपड आणि मोहाली येथील घरावर, कार्यालयावर आणि अन्य ठिकाणांवर एकाचवेळी छापे टाकले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 5 कोटी रोख, दीड किलो सोने, लक्झरी कारच्या चाव्या, जमीन-जुमल्याची कागदपत्र ताब्यात घेतली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

दरम्यान, पंजाबचे पोलीस महासंचालक सुखचैन सिंग गिल यांनीही सीबीआय कार्यालयाला भेट दिली. हा प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. विशेष म्हणजे सीबीआयच्या कारवाईची पंजाब पोलिसांना खबरही नव्हती. तसेच राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही यावर टिप्पणी करणे टाळले आहे.