बुडता पंजाब, 1300 गावे पाण्यात, 30 जणांचा मृत्यू

पंजाबमधील 9 जिह्यांमध्ये पुराचा फटका बसला आहे. पंजाबमधील 1 हजार 300 गावे पाण्यात बुडाली असून आतापर्यंत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून लाखो लोक बेघर झाले आहेत. पंजाबमधील तरनकारन, अजनाला, पठाणकोट, फाजिल्का, अमृतसर जिह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. या जिह्यांना चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला आहे.

पंजाबमध्ये पुराच्या पाण्यामुळे आतापर्यंत 94,061 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वात जास्त नुकसान मानसा (17,005 हेक्टर), कपूरथला (14,934 हेक्टर), तरनतारन (11,883 हेक्टर), फिरोजपूर (11,232 हेक्टर), पठाणकोट (2442 हेक्टर) चे नुकसान झाले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे. पंजाब सरकारने मदत कॅम्प उघडले आहे. सर्व जिह्यात एकूण 129 मदत केंद्रे उभारली आहेत. पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी 114 बोटी, एक हेलिकॉप्टर, एनडीआरएफची 20 पथके, एअरफोर्स, नौदल, लष्कराचे जवान मदत कार्यासाठी सरसावले आहेत.

 पंजाबच्या पूरग्रस्तांसाठी आप नेत्यांचा पगार

पंजाबमध्ये महापुराने हाहाकार उडाला आहे. येथील पीडितांच्या मदतीसाठी आम आदमी पार्टीचे आमदार, खासदार आपला एक महिन्याचा पगार पंजाबच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी देणार आहेत, अशी घोषणा आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी ‘एक्स’वरून दिली आहे.  पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे.