भाजप घाबरत आहे, म्हणूनच आपल्याला जखमी केले; ममता बॅनर्जी यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्व पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी आता प्रचाराने वेग घेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पुरुलियामध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबेल केला.

आज आपण येथे का आलो आहोत, हे सगळ्यांना माहित आहे. आपल्याला खूप मारहाण करण्यात आली. हात- पाय पोटावर मारण्यात आले. माझा पाय फक्त शिल्लक होता. आता पायालाही मोठी जखम झाली आहे. भाजप आपल्याला घाबरत आहे. प्रचारासाठी आपण फिरलो असतो, तर त्यांचा दारुण पराभव झाला असता, त्यामुळेच त्यांनी आपल्याला जखमी केले आहे, असा आरोप बॅनर्जी यांनी केला.

ममता बॅनर्जी मोडतील, पण वाकणार नाही, हे त्यांना माहित नाही. आपला पाय जखमी असतानाही आपण जनतेच्या आशिर्वादानेच फिरत आहोत. आपण महिलांच्या सन्मानाचे रक्षण करत असल्याचेही त्यांनी सांगितले. आमच्या सरकारने या भागातील पाण्याची समस्या सोडवली आहे. जमदेशपूरमधील आदिवासींच्या जमीनी भाजपने ताब्यात घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजप खोटी आश्वासने देत आहे, हे जनतेला कळले आहे. आजपर्यंत कोणाला 15 लाख रुपये मिळाले आहेत का, असा सवालही त्यांनी केला. भाजप हा मीर जाफर आणि गुंडाचा पक्ष असल्याचा आरोपही त्यांनी केला. उत्तर प्रदेशात महिला आणि दलितांची बिकट परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.