दारू पिण्याच्या कारणावरून तरुणाचा सपासप वार करून खून, दोन आरोपींना अटक

प्रातिनिधिक फोटो

पूर्णा शहरातील हरी नगर परिसरामध्ये राहणार्‍या एका 22 वर्षीय युवकाचा दोन युवकांनी दारू पिण्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने सपासप वार करून गळा चिरून खून केल्याची घटना गुरुवार सायंकाळी रेल्वे कॉटर परिसरामध्ये घडली. या प्रकरणी 2 आरोपींना पूर्णा पोलिसांनी गजाआड केले आहे.

पूर्णा शहरातील हरीनगर परिसरामध्ये राहणारा नितीन गणेश खरगखराटे (22) यास गुरुवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पंचशील नगर परिसरांमध्ये राहणारा आरोपी विकास बापूराव चौदनते व रोशन नाना इंगोले या दोघांनी रेल्वेकॉटर परिसरामध्ये फोन करून बोलावून घेतले. या दोघांनी मिळून नितीन यास सुरुवातीला ‘दारू पिण्यासाठी पैसे का देत नाहीस’ या कारणावरून त्याच्याशी झटापट केली. त्यानंतर या तिघांमध्ये बाचाबाची झाली ‘तू आम्हाला दारू पिण्यासाठी पैसे दे’ म्हणून दोघांनी त्याच्याजवळ तगादा लावला. परंतु त्याच्याजवळ पैसे नसल्यामुळे या दोघांनी त्याला सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. परंतु नंतर घटनास्थळावर बाचाबाची होऊन आरोपी विकास बापूराव चौदनते यांनी नितीन याचे हात धरले व रोशन नाना हिंगोले याने आपल्या हातातील धारदार शस्त्राने नितीन यांच्या मानेवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यामध्ये तो गतप्राण झाला.

या घटनेची माहिती मिळताच पूर्णेचे पोलीस निरीक्षक गोवर्धन भूमे व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी दीपिका गणेश खरग खराटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपी विरुद्ध पूर्णा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना पूर्णा पोलिसांनी गजाआड केले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गोवर्धन भूमे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या