
एकीकडे महाराष्ट्रात राहूनही हिंदीतील अनेक कलाकारांना मराठी बोलता येत नाही. नुकतंच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला यावरून झापलं होतं. ‘अरे, मराठीत बोल की…’ असा टोला लगावला होता. ही घटना ताजी असताना साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याने एका कार्यक्रमात मराठीत संवाद साधत सगळ्यांचे मन जिंकले आहे.
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला आहे. सध्या या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर ‘पुष्पा’ चांगलीच कमाई करताना दिसत आहे. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने नुकतेच अल्लू अर्जुनने मुंबईत एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्या वेळी अर्जुनने चक्क मराठीत संवाद साधला. ‘सर्वांना माझा नमस्कार…’ अशी सुरुवातच त्याने केली. त्याच्या वाक्यावर जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. या कार्यक्रमाला रश्मिका मंदनासह अन्य कलाकार उपस्थित होते. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट नुकताच पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.


























































