इंडोनेशियन ओपन : सिंधूचे जेतेपदाचे स्वप्न भंगलं, जपानच्या यामागूचीकडून अंतिम सामन्यात पराभव

65

सामना ऑनलाईन । जकार्ता

हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचे यंदाच्या हंगामातील प्रतिष्ठेचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न रविवारी भंगले. इंडोनेशिया ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढतीत सिंधूला जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. यामागुचीने सिंधूचा 15-21, 16-21 असा पराभव केला. सिंधूने हा मुकाबला अवघ्या 51 मिनिटांमध्ये गमावला. जगातील क्रमांक 4 ची बॅडमिंटनपटू यामागूचीचा बीडब्ल्यूएफ दौऱ्यात सिंधूविरुद्धचा हा पाचवा विजय आहे. यापूर्वी दोघी 14 वेळा आमनेसामने आल्या. यात सिंधू 10-4 अशी आघाडीवर होती.

महिला एकेरी अंतिम लढतीत पहिल्या गेममधे सुरुवातीला सिंधू आघाडीवर होती. पण आपल्या अफलातून स्मॅशेसचा वापर करीत जपानी यामागूचीने पिछाडीवरून सिंधूला मागे टाकत पहिला गेम 21-15 असा जिंकला.सुरुवातीला आक्रमक खेळ करणाऱ्या सिंधूने अनेक चुका नोंदवत आघाडी घेण्याची संधी अनेकदा गमावली.त्यामुळेच वेगवान खेळ करणाऱ्या यामागूचीने हि लढत आपल्या बाजूने झुकवत सिंधूला पराभूत केले.जागतिक पाचव्या मानांकित सिंधूने यंदाच्या हंगामात सिंगापूर ओपन आणि इंडिया ओपनच्या उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती.पण ती जेतेपदापर्यंत मात्र पोहोचू शकलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या