‘पीडब्ल्यूडी’ने ‘नगर सिव्हिल’ला केले होते अलर्ट, शॉर्टसर्किट, अनियमित दाबाबाबत ऑक्टोबरमध्येच दिले होते पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा रुग्णालयाच्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र आता समोर आले आहे. पीएससी प्लाण्टसह एक्प्रेस फीडरवरून देण्यात आलेले कनेक्शन व त्याच्या धोकादायक केबलमुळे होऊ शकणाऱ्या परिणामांबाबत ऑक्टोबर महिन्यातच जिल्हा रुग्णालयाला पूर्वकल्पना दिली गेली असल्याचे या पत्रावरून स्पष्ट होत आहे.

जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागात 6 नोव्हेंबर रोजी आग लागून तेथील 14 रुग्णांचा मृत्यू झाला. आज या घटनेला एक महिना पूर्ण झाला. या घटनेची सरकारने विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली. त्याचा अहवालही शासनाकडे सादर झालेला आहे. यात आगीच्या घटनेचे कारणही स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे. सरकारकडून याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील विद्युत व्यवस्थेतील दोष व एक्प्रेस फिडरवरून देण्यात आलेले कनेक्शन व त्यासाठी वापरण्यात आलेली केबल, धोकादायक अवस्थेतील केबल व यामुळे होऊ शकणाऱ्या परिणामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपअभियंत्यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला पूर्वकल्पना दिली होती, असे सांगितले जात होते. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनीही एक्प्रेस फिडरवरून बेकायदेशीर कनेक्शन दिल्याचा आरोप करीत पोलिसांकडे फिर्यादही दिली होती. त्याची दखल त्यावेळी घेतली गेली नाही. तसेच ‘पीडब्ल्यूडी’ने दिलेल्या पत्रानंतरही उपाययोजना झालेल्या नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

जिल्हा रुग्णालयाला एक्प्रेस फिडरद्वारे विद्युतपुरवठा करण्यात आलेला असून, सबस्टेशनमधून एबी स्वीच व एचटी केबलद्वारे अन्यत्र विद्युतपुरवठा देण्यात आलेला आहे. त्या कनेक्शनची सबस्टेशनमध्ये केबल अस्ताव्यस्त स्थितीत असून, ते धोकादायक आहे. रुग्णालयाला एक्प्रेस फिडरवरून केबलद्वारे विद्युतपुरवठा घेण्यात आला आहे. त्याच केबलवरून पुढे एक्प्रेस फिडरचा विद्युतपुरवठा अन्यत्र देण्यात आला आहे. पुढे जाणारा विद्युतभार वाढला तर ओव्हरलोडमुळे आपली केबल खराब होऊ शकते अथवा नादुरुस्त होऊ शकते. त्यामुळे विद्युतपुरवठा खंडित होऊ शकतो. सबस्टेशनचे काम करावयाचे असल्यास काही वेळेकरिता विद्युतपुरवठा खंडित करीत असताना जास्त विद्युतभारामुळे जास्त प्रमाणात स्पार्ंकग होते. अनियमित विद्युतदाबामुळे विद्युत उपकरणे खराब होत आहेत. त्यामुळे याबाबत ‘महावितरण’ला पुढे जाणाऱया विद्युतपुरवठय़ाकरिता योग्य ती संचमांडणी करून सुरळीत विद्युतपुरवठा देण्याबाबत सूचना कराव्यात, असे विद्युत अभियंत्यांनी स्पष्ट केले होते.

कायमस्वरूपी उपाय करण्याची विद्युत अभियंत्यांची सूचना

जिल्हा रुग्णालय परिसरात पीएससी प्लाण्ट उभारण्यात आलेला आहे. या प्लाण्टमधील स्टॅबिलायझर वारंवार नादुरुस्त होत असल्यामुळे सबस्टेशन ‘ओ.ओ. फ्यूज’ वितळून पूर्ण विद्युतपुरवठा खंडित होत आहे. त्याबाबत संबंधित यंत्रणेकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत कळवावे, असे विद्युत अभियंत्यांनी सांगितले होते. तसेच 5 ऑक्टोबर 2021 रोजी झालेला बिघाड तीव्र स्वरूपाचा होता. आपण वापरलेले स्विच गीअर ट्रिप होतात. मात्र, बिघाडामुळे झालेल्या शॉर्टसर्किट आणि अनियमित विद्युतदाबामुळे वीज संचमांडणीतील रोहित्र आणि इतर सुरक्षा यंत्रणेला धक्का पोहोचून कमजोर होतात. त्यामुळे वारंवार बिघाड होणार नाही, याकरीता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची सूचनाही त्यांनी केली होती. असे असतानाही त्याची दखल घेतली गेली नाही. चौकशी समितीने व पोलीस प्रशासनाने गुह्याचा तपास करताना ही सर्व कागदपत्रे संकलित केल्याने एक्प्रेस फिडरबाबत झालेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी अहवालात व पोलीस तपासात काय दखल घेण्यात आली, हे गुलदस्त्यातच आहे.