क्वारंटाईन संपल्यावर दोन बायकांच्या घरी तबलिगीची पळापळ! तिसऱ्यांदा पुन्हा क्वारंटाईन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे अतिशय कडक शिस्तीने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, केरळमध्ये एका तबलिगीने हे सगळे नियम धाब्यावर बसवल्याचं उघड झालं आहे. दोन वेळा क्वारंटाईनमधून बाहेर येऊन आपल्या दोन बायकांच्या घरी ये-जा केल्याने त्याला आता तिसऱ्यांदा क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृ़त्तानुसार, केरळ येथील मलप्पुरम भागात राहणारा हा इसम मार्च महिन्यातील तबलिगी जमातच्या दिल्ली येथील कार्यक्रमाहून परतला होता. त्यानंतर त्याला घरात क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मात्र, तो कालावधी उलटून गेल्यानंतर घरातच न थांबता तो त्याच्या पहिल्या पत्नीकडे म्हणजेच मलप्पुरमहून कायकुलम या ठिकाणी पोहोचला. तिथे काही काळ राहिल्यानंतर तो तिथूनही निघाला. पण, त्यामागे वेगळं कारण होतं.

या इसमाने दोन विवाह केले असून त्याच्या दोन्ही पत्नी वेगवेगळ्या गावांमध्ये राहतात. त्यामुळे पहिल्या पत्नीकडे राहिल्यानंतर तो कायकुलमहून निघाला आणि नीलांबुर या ठिकाणी आपल्या दुसऱ्या बायकोकडे गेला. तिथे पोलिसांनी त्याला घरात क्वारंटाईन केलं. तो कालावधीही पूर्ण झाला आणि हा इसम पुन्हा मालवाहतूक करणाऱ्या गाडीतून आपल्या पहिल्या पत्नीकडे कायकुलम गावात पोहोचला.

मात्र, तिथे पोहोचल्यानंतर काही कारणाने त्याच्यात आणि त्याच्या पहिल्या बायकोमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि तो तिची तक्रार घेऊन पोलिसात गेला. त्यावेळी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आणि त्याचे प्रताप उघड झाले. लॉक डाऊन नियमांचं उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी आता या इसमाला पुन्हा होम क्वारंटाईन केलं आहे तसंच त्याचा क्वारंटाईन काळ संपल्यानंतर त्याला अटकही केली जाणार आहे.