नियम पाळाल तरच ब्रिस्बेनला या! क्वीन्सलॅण्ड सरकारकडून हिंदुस्थानी संघाला सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 15 जानेवारीपासून खेळवण्यात येणाऱया चौथ्या कसोटीवरून वाद निर्माण झाला आहे. क्वीन्सलॅण्डमधील ब्रिस्बेन येथे दोन देशांमधील अखेरचा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. पण येथे कोरोनासंबंधित नियम कडक आहेत. या नियमाअंतर्गत हिंदुस्थानी खेळाडूंना ‘हॉटेल-स्टेडियम-हॉटेल’ या मर्यादेतच राहावे लागणार आहे.

क्रिकेटपटूंना ट्रेनिंग वगळता इतरत्र जाण्याची परवानगी देण्यात येणार नाही. याप्रसंगी क्वीन्सलॅण्ड सरकारकडून टीम इंडियाला स्पष्टपणे सांगण्यात आले की, नियम पाळाल तरच ब्रिस्बेनला या, अन्यथा तुम्हाला येथे एण्ट्री मिळणार नाही’.

याच कारणामुळे टीम इंडिया ब्रिस्बेनला चौथा कसोटी सामना खेळण्यास इच्छुक नाही. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून नियोजित वेळापत्रकानुसार मालिका पार पडेल हे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

तसेच बीसीसीआयकडूनही ‘वेट अॅण्ड वॉच’ धोरण अवलंबले असून ठिकाण बदलण्याची मागणीही त्यांच्याकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी ब्रिस्बेन येथेच दोन देशांमधील चौथी कसोटी होईल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

ठिकाण बदलण्याची मागणी अद्याप नाही

हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यामधील तिसरी कसोटी सिडनीला आणि चौथी कसोटी ब्रिस्बेनला होणार आहे. सिडनी येथील वाढत्या कोरोना संसर्गामुळे क्वीन्सलॅण्ड सरकारकडून सिडनी येथून येणाऱया प्रवाशांवर बंदी लावण्यात आली आहे. पण कसोटीमध्ये सहभागी होणाऱया खेळाडूंसाठी ही बंदी लावण्यात आलेली नाही. कारण खेळाडू ‘बायो बबल’मध्ये आहेत. पण सिडनीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना 15 दिवस कडक नियमात राहावे लागणार आहे. ब्रिस्बेनमध्ये पोहोचल्यानंतरही त्यांना ‘हॉटेल -स्टेडियम-हॉटेल’ या मर्यादेतच राहावे लागणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनाकडून ब्रिस्बेन कसोटीत न खेळण्याचे पाऊल उचलण्यात आले होते. पण बीसीसीआयकडून चौथ्या कसोटीसाठी ठिकाण बदलण्याची मागणी करण्यात आलेली नाही. एका पदाधिकाऱयाने याबाबत सांगितले की, चौथ्या कसोटीला अजून अवधी आहे. आणखी थोडे दिवस वाट बघूया.

टीम इंडियाचे सर्व खेळाडू आज सिडनीला रवाना

सिडनी येथे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे ऑस्ट्रेलिया व हिंदुस्थान या दोन्ही देशांतील क्रिकेटपटूंना सराव करण्यासाठी मेलबर्न येथेच ठेवण्यात आले होते. आता सोमवारी टीम इंडियाचे सर्व खेळाडू चार्टर्ड विमानाने सिडनीला रवाना होणार आहेत. यामध्ये रोहित शर्मा, रिषभ पंत, पृथ्वी शॉ, शुभमन गिल आणि नवदीप सैनी या विलीगीकरणात असलेल्या पाचही खेळाडूंचाही समावेश आहे.

प्रशासकीय व्यवस्थापक काय करीत होते…

हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना बायो बबलमध्ये राहण्यासाठी किंवा त्यांनी नियम तोडू नये यासाठी बीसीसीआयकडून प्रशासकीय व्यवस्थापकाची निवड करण्यात आली आहे. गिरीश डोंगरे यांच्याकडे ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रोहित शर्मासह हिंदुस्थानच्या पाच खेळाडूंनी ‘बायो बबल’ तोडून इनडोअर रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण केले. यामुळे गिरीश डोंगरे यांच्या कामावरच प्रश्न उभे ठाकले आहे. याप्रसंगी बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱयाने स्पष्टपणे सांगितले की, खेळाडूंना नियमात ठेवण्याची जबाबदारी गिरीश डोंगरेंकडे होती. यावेळी त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे होते असे वृत्त एका इंग्रजी दैनिकामधून समोर आले आहे.

…तर हिंदुस्थानला धक्का बसणार

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील चौथी कसोटी ब्रिस्बेन येथेच होणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आले. इतक्या कमी अवधीत कसोटीसाठी लागणारी खेळपट्टी तयार करणे मुश्कील आहे, असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, तिसऱया कसोटीआधी हिंदुस्थानच्या पाच खेळाडूंना विलीगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. ‘बायो बबल’ तोडल्यामुळे त्यांना आयसोलेट करण्यात आले आहे. बीसीसीआय व क्रिकेट ऑस्ट्रेलिया हे दोघेही मिळून या प्रकरणाची चौकशी करीत आहे. हिंदुस्थानचे खेळाडू यामध्ये दोषी सापडल्यास टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो. कारण रोहित शर्मा, शुभमन गिल व रिषभ पंत हे तीनही खेळाडू सिडनी कसोटीत खेळणार आहेत. या तिघांशिवाय हिंदुस्थानचा फलंदाजी विभाग कमकुवत होईल.