सईद शेख ‘आरएम भट श्री’चा मानकरी, अजिंक्य जाधव ‘मेन फिजिक्स’चा विजेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेवटच्या क्षणापर्यंत अतितटीच्या झालेल्या लढतीत मोहम्मद सईद शेख याने आपल्या पिळदार शरीरयष्टीचे दर्शन घडवत अन्य शरीरसौष्ठवपटूंचे आव्हान मोडीत काढून यंदाचा ‘आरएम भट श्री’ होण्याचा मान पटकावला, तर ‘मेन्स फिजिक्स’मध्ये अजिंक्य जाधव हा विजेता ठरला.

सालाबादप्रमाणे यंदाही कामगार वस्तीतील मानाची ‘आरएम भट श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडली. ओमकार साईल, सागर सोनावणे, गौरव साळगावकर आणि सईद शेख या गटविजेत्यांमध्ये ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’साठी तगडी लढत झाली. अखेर इतर गटविजेत्यांना मागे टाकत सईद शेख हा मानाचा ‘आरएम भट श्री’चा मानकरी ठरला, तर मेन्स फिजिक्स स्पर्धेत अजिंक्य जाधव किताब विजेता तसेच ‘बेस्ट इम्प्रुव्हमेंट’ शरारीसौष्ठवपटू ठरला. अजिंक्यला तगडी लढत देणारा सागर सोनावणे याने ‘बेस्ट पोझर’ मान पटकावला. विजेत्यांना आकर्षक चषक, रोख रक्कम, बँग आदी बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. व्यायामशाळेचे मास्तर शरद (भाई) आंबोले, काशिनाथ जाधव, विष्णू घाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा उत्साहात पार पडली. या वेळी राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू विक्रांत देसाई, रोहन धुरी, प्रवीण गणवीर, रोहीत साखरकर, विजय जाधव तसेच संदीप बनसोडे, भूषण पाटकर, हेमल राणा, संजय कोष्टी या मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.