राधाकृष्ण विखे-पाटील 12 एप्रिलला खरंच भाजपमध्ये प्रवेश करणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे 12 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे. पुत्र डॉ. सुजय विखे यांच्यापाठोपाठ वडील राधाकृष्ण विखे-पाटील हे देखील भाजपमध्ये गेल्यास राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडणार आहे. याचा फटका मुख्यत्वे काँग्रेसला बसणार आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या 12 तारखेच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधला असता त्यांनी या बातम्या म्हणजे निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. ते पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. असं असलं तरी नगरमध्ये आपण सुजय विखेंविरोधात म्हणजेच भाजपविरोधात प्रचार करणार नाही, हे विखे यांनी पूर्वीच स्पष्ट केले होते. यामुळेच ते देखील भाजपमध्ये जाणार असल्याची जबरदस्त चर्चा सुरू झाली होती.

दोन दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी चोंडेश्वरी मंदिरात शहरातील व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये त्यांनी सुजय विखे-पाटील यांना निवडून द्या असे आवाहन केले. या बैठकीत बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की ‘ज्यांच्यावर खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा उमेदवाराला निवडून द्यायचे की श्रद्धा व सबुरीचा मंत्र जपलेल्या डॉ. सुजय विखे सारख्या तरुणाला लोकसभेत पाठवायचे याचा मतदारांनी विचार करावा.’ या बैठकीला जि.प. सदस्य अनिल कराळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष चोरडिया उपस्थित होते.डॉ. सुजय विखे यांच्या मातोश्री आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे-पाटील यांनी गुढी पाडव्यापासून मुलाच्या प्रचारासाठी दौरे सुरू केले आहेत. सुजयचे पालकत्व स्वीकारा आणि दक्षिण भागाच्या विकासासाठी त्याला खासदार म्हणून निवडून द्या, अशी भावनिक साद त्या मतदारांना घालताना दिसत आहेत.

या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात गोळा आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय काँग्रेस ‘हायकमांड’ घेतील. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराच्या निवडणूक प्रचारात विखे यांच्या छायाचित्राचा अथवा नावाचा वापर करू नका, अशी सूचना प्रदेश काँग्रेसने राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी दिली आहे.