
गेले दहा ते बारा दिवस पावसाने दडी मारल्याने कोरडवाहू जमिनीवरील पिके करपू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. जेमतेम वीस टक्के राहिलेली भातरोप लावण अंतिम टप्प्यात आली आहे. पण, पाणी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. लावलेली रोपे पाण्याअभावी वाळू लागली आहेत. काही ठिकाणी ओढय़ावर इंजिन बसवून पिके जगवण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱयांचा चालू आहे.
राधानगरी तालुका डोंगरदऱयांचा तालुका म्हणून ओळखला जातो. येथे डोंगरमाथ्यावर हजारो हेक्टर कोरडवाहू क्षेत्रात नाचणी, भात, भुईमूग अशी पिके बळीराजा घेत असतो. तालुक्यात मृग आणि आर्द्रा नक्षत्रात अत्यल्प पाऊस झाला. मात्र, पुनर्वसू नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने पावसाअभावी खोळंबलेल्या भातरोप लावणी, नाचणी मांडणीच्या कामाला सुरुवात केली. 80 टक्के कामे पूर्ण झाली. मात्र, पुष्य नक्षत्रात पावसाने पुन्हा ओढ दिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अद्यापि काही शेतकऱयांची भातरोप लागण व नाचणी मांडणीची कामे अपूर्ण आहेत. रोप लागण केलेली भात व मांडणी केलेली नाचणी पिके वाळू लागल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे.
आजपर्यंत एखादा अपवाद वगळता कधीही पावसाने पाठ फिरवली नव्हती. गेले दहा-बारा दिवस पाऊस झालेला नाही. रोपे लावलेली भातशेती, नाचणी, भुईमूग जगवणे अवघड झाले आहे. पावसाच्या मुख्य नक्षत्रातच पावसाने दडी मारल्याने भातशेती जगवायची कशी, हा प्रश्न आहे.
– एकनाथ चरापले, शेतकरी, शिरगाव, राधानगरी.

























































