
टोलवसुली म्हणजे कायदेशीर लूट आहे. यामुळे केवळ पैसाच नव्हे तर लोकांचा वेळ खर्ची जातो. इंधनाचे नुकसान होते, मोठी संधी हुकते, अशी टीका आपचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी केली.
राघव चढ्ढा म्हणाले की, मी आणि देशातील प्रत्येक नागरिकाचे म्हणणे आहे की, टोल कर ही एक प्रकारची कायदेशीर लूट बनत चालली आहे. कारण वाहन खरेदीपासून इंधन भरण्यापर्यंत आधीच अनेक कर भरावे लागतात. त्यात टोलची भर पडते. टोल कर हा रस्त्याचा खर्च पूर्ण होईपर्यंत घेतला जातो. मात्र काही ठिकाणी रस्तेबांधणीचा खर्च वसूल झाल्यानंतरही तो घेतला जातोय. उदाहरणार्थ, दिल्ली-नोएडाचा डीएनडी फ्लायओव्हर. कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर तिथली टोल वसुली थांबवण्यात आली, असे राघव चढ्ढा म्हणाले. राघव चढ्ढा पुढे म्हणाले, आपण रस्त्यांसाठी एवढे पैसे देतो, मग आपली अपेक्षा असते की, रस्ते चांगले असावे, ड्रेनेज सिस्टम, लेन डिमार्किंग, लायटिंग चांगली असावी. मात्र आपल्याला खराब रस्ते, खड्डे बघायला मिळतात. तुम्ही टोल भरण्यासाठी रांगेत थांबता. रांगेत तुमचा वेळ फुकट जातो. जवळपास अर्धा तास ते 40 मिनिटे वेळ वाया जातो. रांगेत तुमची गाडी ऑन असते. म्हणजे इंधन फुकट जाते. रांगेमुळे कुणाचा जॉब इंटरह्यू, कुणाची मीटिंग किंवा डॉक्टर अपॉइंटमेंट मिस होऊ शकते. त्याचा भुर्दंडही तुम्हाला बसतो. या सर्व खर्चाचा विचार केला तर टोल कराव्यतिरिक्त अन्य नुकसानही मोठे होते, असे राघव चढ्ढा म्हणाले.
राघव चढ्ढा म्हणाले, मी एक मागणी केली होती की, कोणत्याही व्यक्तीला कर भरण्यासाठी रांगेत पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला तर त्याच्याकडून टोल घेता कामा नये. त्याची गाडी फ्रीमध्ये जाऊ दिली पाहिजे.

























































