राहाता येथे एकाच वेळी तीन ठिकाणी घरफोडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहाता येथील साईनगर मध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. येथे तीन ठिकाणी घरफोड्या करून रोख रक्कम, सोने टिव्ही व मोटार गाडी असा सुमारे पाच लाखाचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

चोरीची ही घटना शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास शहरातील मुख्य शिवाजी चौकालगत असलेल्या साई नगर मधे घडली. कापड व्यापारी प्रसाद खर्डे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत चोरट्यांनी कपाट उचकटून ६० हजार रूपये रोख, दोन तोळे सोन्याचे दागिने लहान मुलांचे ड्रेस, साड्या व दारात लावलेली वॅगन आर ही मोटार असा सुमारे पाच लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. कपाटात ठेवलेल्या वॅगन आऱ गाडीच्या चाव्या काढून सर्व माल त्या गाडीत टाकला. तसेच त्याच घरासमोर राहात असलेल्या असलेल्या शिर्डी येथील एका बँक मँनेजरच्या बंद घरात प्रवेश करून दोन एल सी डी टिव्ही व काही सोनेही या चोरांनी लंपास केले. याच परिसरात आणखी एका घरात घुसून चोरी केल्याचे कळते. ही चोरीची घटना सी सी टीव्ही मधे कैद झाली आहे.

त्याच रात्री साकुरी हद्दीतही या चोरट्यांनी तिन ते चार दुकाने फोडली असून तेथे त्यांनी आपल्या बरोबर असलेल्या दोन मोटारसायकली टाकून दिल्या होत्या. पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत . राहाता व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलिंग बंद झाल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले असून मोटारसायकल चोरी मोबाईल चोरी व दुकान फोड्या याचा समावेश आहे.

या प्रकरणी प्रिती प्रसाद खर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला असून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे व पोलीस निरिक्षक सुभाष भोये यांनी भेट दिली.