अखेर द्रविड गुरुजी तयार; टीम इंडियाच्या ’महागुरू’ पदासाठी भरला अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी काम करण्यास राजी नसलेले माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी अखेर या पदासाठी आपला अर्ज बीसीसीआयकडे सादर केल्याचे आनंदी वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. आता द्रविड यांचा मोलाचा सल्ला भविष्यात हिंदुस्थानी संघाला मिळणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. कारण संघाच्या महागुरूपदासाठी द्रविड यांच्या नावाचीच मोठी चर्चा होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) द्रविड यांची जागा घेऊ शकतो. सध्या द्रविड एनसीएचे  प्रमुख आहेत. काही दिवसांपूर्वी द्रविड यांचे सहकारी पारस म्हांब्रे यांनी हिंदुस्थानी संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. टी-20 विश्वचषकानंतर रवी शास्त्र्ााr टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडणार आहेत. त्यानंतर बीसीसीआयसाठी द्रविड हा आवडता पर्याय होता. दुबईत संपन्न झालेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान बीसीसीआय सचिव जय शहा आणि अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी द्रविड यांच्यासोबत संघाच्या महागुरूपदाबाबत चर्चा केली होती.

बीसीसीआयने दिग्गजांशी साधला होता संपर्क

बीसीसीआयने टीमसोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करणाऱया अनिल कुंबळे, रिकी पॉण्टिंग, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासह काही इतर लोकांशी संपर्क साधला होता. सुरुवातीला कुंबळेचे नाव आधी पुढे आले, पण नंतर त्याचे नाव शर्यतीतून बाहेर पडले. राहुल द्रविड यांचे नाव आठवडाभराहून अधिक काळ निश्चित असल्याचे मानले जात होते. 48 वर्षीय द्रविड सध्या बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहत असून यापूर्वीही त्यांनी श्रीलंकेच्या दौऱयावर प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.