बीसीसीआयच्या कोविड टास्क फोर्सची जबाबदारी राहुल द्रविडकडे सोपवणार

495
sourav ganguly and rahul dravid

कोरोनामुळे ठप्प असलेले क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी बीसीसीआयने पाऊल उचलले आहे. मात्र प्रत्यक्षात सरावाला सुरुवात होण्याआधी खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ सर्वांनाच टेस्टमधून जावे लागणार आहे. त्यानंतर सरावादरम्यानही विविध नियमांचे पालन करावे लागणार आहे. यासाठी बीसीसीआयने 100 पानांची सूचना यादीही तयार केलीय. एवढेच नव्हे तर कोव्हिड टास्क फोर्ससाठी सदस्यांचीही निवड केली जाणार आहे. याचे नेतृत्व राहुल द्रविडकडे सोपवण्यात येण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे. या फोर्समध्ये मेडिकल ऑफिसर, बीसीसीआय एजीएम, क्रिकेट ऑपरेशन्स व स्वच्छता अधिकारीही असणार आहेत.

फिटनेसबद्दल माहिती द्यावी लागणार

सरावाला सुरुवात करण्याआधी प्रत्येक खेळाडूला एक फॉर्म भरावा लागणार आहे. त्यामध्ये सध्याच्या त्याच्या फिटनेसबाबत माहिती द्यावी लागणार आहे. एखाद्या खेळाडूला थोडा त्रास होत असेल तर राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीतील कोच त्या खेळाडूशी व्हिडीओ चॅटद्वारे संपर्क साधेल. त्या खेळाडूसाठी एक प्रोगाम देण्यात येईल. व्हिडीओ कॉलद्वारे सातत्याने त्या खेळाडूशी संपर्क ठेवून त्याच्या आजारावर लक्ष
ठेवले जाणार आहे.

वर्कशॉपचे आयोजन

कॅम्प सुरू होण्याआधी बीसीसीआयकडून खेळाडू व स्टाफसाठी वर्कशॉपचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी सलंग्न संघटनांना सहकार्य करण्याचे आवाहनही बीसीसीआयकडून करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनासंबंधित माहिती देण्यात येऊन जागरुकता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमी सुरू झाल्यानंतर देशभरातून अधिकाधिक क्रिकेटपटूंचा प्रवेश लक्षात घेता जास्तीत जास्त ऑनलाइन गोष्टींवर लक्ष देण्यात येणार आहे. फिजिओथेरेपीबाबत व्हर्च्युअलवर जास्त फोकस करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या