
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
काँग्रेसने पुन्हा ‘गरिबी हटाव’चा नारा दिला आहे. ‘न्याय स्किम’ची घोषणा करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महिन्याला 12 हजार रुपयांहून कमी उत्पन्न असणाऱ्या देशातील 20 टक्के गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्यात येतील, अशी घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ 5 कोटी कुटुंबांतील 25 कोटी लोकांना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी ही घोषणा केली. गेल्या पाच वर्षांत देशातील गोरगरीब जनतेची फसवणूक झाली आहे. देशात काँग्रेसचे सरकार आल्यास गरीबांना न्याय मिळेल. अर्थतजज्ञांनी चर्चा करून ‘न्याय स्किम’ जाहीर करीत असल्याचे ते म्हणाले.
काय आहे योजना?
‘न्याय स्किम’ योजनेद्वारे देशातील 20 टक्के जनतेला दरवर्षी केंद्र सरकार 72 हजार रुपये देईल. n सुमारे 5 कोटी कुटुंबातील 25 कोटी गरीबांना लाभ होईल.
ज्यांचे प्रतिमहिना उत्पन्न 12 हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्यांचा या योजनेत समावेश असेल. जर एखादी व्यक्ती महिन्याला आठ हजार रुपये कमावत असेल तर सरकार चार हजार रुपये त्याच्या बँक खात्यात जमा करेल. त्यामुळे प्रत्येकाचे किमान मासिक उत्पन्न 12 हजार होईल.





























































