
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘उत्स्फूर्त’ प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळतात हे बरेच आहे. त्या प्रश्नांना ते सामोरे गेले तर आपल्या सगळय़ांसाठी ती मोठीच कुचंबणा ठरेल, असा जबरदस्त टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना आज लगावला.
मोदी यांनी सिंगापूर येथील नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीला नुकत्याच दिलेल्या भेटीवेळी एक मुलाखत दिली. त्यावेळी मोदी यांनी प्रश्नाला हिंदीतून उत्तर दिल्यानंतर दुभाषी त्यांच्या उत्तराचा लिखित स्वरूपातील अनुवाद वाचून दाखवायचा. त्यामुळे मोदी यांच्या त्या मुलाखतीच्या प्रश्नोत्तरांची ‘पटकथा’ पूर्वनियोजित होती, अशी जोरदार चर्चा सर्वत्र रंगली आहे.
त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदींवर ट्विटरवरून निशाणा साधला. मोदी यांच्या मुलाखतींची पटकथा आधीच तयार केलेली असते, असा स्पष्ट आरोपच त्यांनी केला. इतकेच नव्हे तर मोदी यांच्या सिंगापूर येथील त्या मुलाखतीचा व्हिडीओही राहुल यांनी टॅग केला आहे. त्यात मोदी यांनी प्रश्नांना हिंदीतून दिलेल्या उत्तरांचा लिखित स्वरूपातील अनुवाद दुभाषी वाचून दाखवत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘उत्स्फूर्त’ प्रश्नांना सामोरे जायचे टाळतात, पण त्यांच्या उत्तरांचा लेखी अनुवाद दुभाषाकडे आधीच तयार असतो. मोदी हे देशाला लाभलेले अशाप्रकारचे पहिलेच पंतप्रधान आहेत– राहुल गांधी, अध्यक्ष काँग्रेस
























































