राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर पुन्हा फोडला मतचोरीचा ‘बाॅम्ब’! हजारो मतदारांची नावं काही मिनिटांत डिलिट, पुरावे केले जाहीर

लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधत मोठा ‘बॉम्ब’ फोडला आहे. राहुल गांधींनी दिल्लीतील इंदिरा भवन स्टेडियममध्ये गुरुवार (18 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेत काही महत्त्वाचे ठोस पुरावे सादर केले. हे पुरावे सादर करताना त्यांनी दावा केला की, “ही मतचोरी निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखालीच घडत आहे. यातील विशेष बाब म्हणजे, या सर्व मतचोरीच्या प्रकाराला केंद्रीय निवडणूक आयोगाचे समर्थन आहे.”

निवडणूक आयोग हे हिंदुस्थानातील लाखो मतदारांना पद्धतशीरपणे लक्ष्य करत असल्याचे यावेळी राहुल गांधी यांनी म्हटले. तसेच त्यांनी पुराव्यादाखल कर्नाटकातील आळंदमध्ये 2023 मध्ये झालेल्या मतचोरीचा दाखलाही दिला. यावेळी 2023 च्या निवडणुकीकरता 6 हजारांपेक्षा अधिक मते वगळण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने, दलित आणि ओबीसी मतदारांचा समावेश होता असे त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले. सदर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मुख्य निवडणूक आयोगावर चांगलेच ताशेरे ओढले. राहुल म्हणाले की, “जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला आढळले की, आळंदमधील मतचोरी ही सेंट्रलाइज्ड पद्धतीने करण्यात आली होती.”

या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एका मतदाराला देखील चर्चा करण्यासाठी बोलावले होते. या मतदाराने त्यांचा अनुभव या परिषदेत सांगितला. या मतदाराच्या नावावरून एकाच घरातील 12 जणांची नावे वगळण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली. मुख्य म्हणजे या घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांना मात्र काहीच माहीत नव्हते. उपस्थित असलेल्या व्यक्तीने सांगितले की, त्यांनी नावे वगळण्यासंदर्भात कधीही कोणालाही फोन केला नाही आणि नाव वगळण्यासाठी कुणालाही पाठवले नाही.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, मी ठोस पुराव्यांसह मतचोरीच्या या मुद्द्यावर भाष्य करत आहे. विरोधी पक्षाला मतदान करणाऱ्यांचीच मते फक्त रद्द केली जात आहेत. मुख्य म्हणजे मतदार वगळण्याचे अर्ज हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. तसेच हा सर्व प्रकार करताना कर्नाटकाच्या बाहेरील फोन नंबरचा वापरही करण्यात आलेला आहे. सूर्यकांत नावाच्या व्यक्तीच्या नावे १४ मिनिटांमध्ये १२ मतदारांचे फॉर्म नावं वगळण्यासाठी भरले गेले होते. याच दरम्यान राहुल यांनी व्हिडिओ दाखवत पुराव्यासह अनेक गोष्टी स्पष्ट केल्या.

या मतचोरीच्या घटनेवर अधिक बोलताना राहुल गांधी म्हणाले की, देशात निवडणुकांच्या माध्यमातून अनेकपद्धतीने गोंधळ माजवला जात आहे. हेच स्पष्ट करण्यासाठी हा आजचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. ते म्हणाले की, “मी हिंदुस्थानातील नागरिकांना स्पष्ट पुराव्याच्या माध्यमातून हेच दाखवणार आहे की, केंद्रीय निवडणूक आयोग हे लोकशाही नष्ट करणाऱ्यांनाच संरक्षण देत आहे.”

सदर मतचोरी विषयी चौकशी कर्नाटकातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) केली. त्यांनी मतचोरी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाशी वारंवार संपर्क केला. पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अद्याप कोणतेही उत्तर दिले नसल्याचा दावा खासदार राहुल गांधी यांनी यावेळी केला. कर्नाटक सीआयडीने यासाठी १८ महिन्यांत १८ वेळा निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. परंतु निवडणूक आयोगाकडून मात्र कोणतेही उत्तर देण्यात आले नाही, असेही यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले.