
लडाखपासून ते देशावरील आर्थिक संकटापर्यंत सर्व गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्णय जबाबदार आहेत. असे असताना त्यांना जाब विचारल्याशिवाय चर्चा होऊच शकत नाही. मी नरेंद्र मोदींना घाबरत नाही, त्यांच्यावर यापुढे टीका करीत राहणार, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका नको असे म्हणणाऱया काँग्रेसच्याच नेत्याला झापले.
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि झारखंडचे प्रभारी आरपीएन सिंग यांनी बैठकीत बोलताना आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याने अनेक मुद्दे भरकटले जातात. यामुळे आपण नरेंद्र मोदींवर थेट टीका न करता त्यांच्या धोरणांवर टीका केली पाहिजे असे मत मांडले. हे न पटल्याने राहुल गांधी यांनी आपण नरेंद्र मोदींना घाबरत नसून यापुढेही त्यांच्यावर टीका करीत राहणार. पक्षातील काही नेते मात्र त्यांच्यावर टीका करण्यापासून दूर राहतात असं म्हटलं. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही राहुल गांधी यांचं समर्थन करत मोदींविरोधात ते एकटेच लढत असल्याचं दिसत आहे असे म्हटले.
काँग्रेसला चीनकडून पैसा
काँग्रेसचे चीनशी छुपे संबंध असून राजीव गांधी फाऊंडेशनला चीनने लाखो रुपयांची देणगी दिली आहे असा खळबळजक आरोप भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे. कोणताही राजकीय पक्ष सरकारच्या परवानगीशिवाय परदेशातून पैसा स्वीकारू शकत नाही. चीनकडून पैसे घेताना काँग्रेसने सरकारची परवानगी घेतली होती का असा सवालही नड्डा यांनी केला. चीन सरकार आणि चीनच्या दूतावासाने 2005-06 मध्ये राजीव गांधी फाऊंडेशनला तीन लाख अमेरिकन डॉलर्स इतकी देणगी दिली होती. फाऊंडेशनच्या देणगीदारांच्या यादीत चीनचा उल्लेख आहे असा दावा नड्डा यांनी केला. इतका पैसा कशासाठी दिला गेला हे देशाला कळायलाच हवे अशी मागणीही त्यांनी केली. चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या काळात सर्व राजकीय पक्षांनी पंतप्रधानांनी पाठिंबा दिला आहे. फक्त एका घराण्याने विरोध केला असून या घराण्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीकाही नड्डा यांनी केली आहे. 2017 मध्ये डोकलाम वाद सुरू असताना राहुल गांधी यांची चीनच्या राजदूतांची गुपचूप भेट घेतली होती असेही ते म्हणाले.

























































